+91 976 502 4443 | awajindialive1@gmail.com |
Breaking News
adjustकोल्हापुरात शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची अतिविराट सभा दोन लाखावर लोक जमतील adjustअरुण डोंगळे चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत मोफत सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन adjustगोकुळ मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी adjustप्राण जाये पर वचन न जाये ; के. पी. पाटील यांचे अभिवचन adjustरुपा वायदंडेंची माघार, शाहू छत्रपतींना पाठिंबा adjustशाहू महाराजांचा आशिर्वाद चालतो, उमेदवारी का नको adjustन्यू पॅलेसनंतर राधानगरी हे तर माझं दुसरं घर...! adjustराजकारण बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते शाहूंच्या विजयासाठी एकवटलेत : अभिजीत तायशेटे adjustअरुण डोंगळे गटाकडून खासदार संजय मंडलिक यांना भक्कम पाठबळाचा निर्धार adjustदेशाचे भवितव्य मोदींच्या हाती सुरक्षित ; संजय मंडलिकांना साथ द्या
schedule06 Jun 22 person by visibility 222 categoryआरोग्य
जागतिक पर्यावरण दिन
दरवर्षी 5 जून हा दिवस 'जागतिक पर्यावरण दिन' म्हणून साजरा केला जातो. पर्यावरणाचे महत्त्व, समस्या व संवर्धन करण्यासाठी व जगभरामध्ये त्याची जनजागृती करण्याच्या हेतूने 'पर्यावरण दिन' साजरा केला जातो. विविध संकल्पना घेऊन या दिनाचे महत्त्व विशद केले जाते. पर्यावरणाच्या अनेक समस्या सध्या जाणवत आहेत. त्याबाबत जनजागृती निर्माण व्हावी यादृष्टीने ही पर्यावरण दिनाचे महत्व आहे. या वर्षीची संकल्पना ओन्ली वन अर्थ अशी आहे. नैसर्गिक पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे तो कमी करणे हाही हेतू आहे. वृक्षलागवड करणे, हरित शहरे विकसित करणे, पर्यावरणपूरक आहार पद्धतीचा स्वीकार करणे, नदी, तलाव, समुद्र किनारे स्वच्छ करणे हा उद्देश आहे. पर्यावरण रक्षणासाठी सक्रिय सहभाग घेणे हेही या वर्षाचे उद्दिष्ट आहे. यामुळे पर्यावरण रक्षण चळवळीस बळ प्राप्त होईल. सजीव व निर्जीव घटक, निसर्गनिर्मित व मानवनिर्मित घटक म्हणजे पर्यावरण होय. थोडक्यात आपल्या सभोवतालची परिस्थिती म्हणजे पर्यावरण होय. भौतिक, रासायनिक व जैविक परिस्थिती असे ही आपण म्हणू शकतो. भूपृष्ठ रचना, हवामान, पाणी, शेती, वनस्पती, वन्यप्राणी हे नैसर्गिक पर्यावरणातील महत्त्वाचे घटक आहेत. परंतु मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणामध्ये बदल झाला त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औद्योगिकरण, शहरीकरण, वाढती लोकसंख्या, प्रदूषण यामुळे पर्यावरणामध्ये बदल झाले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल ही बिघडला. मानव -निसर्ग संघर्ष निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम मानवी जीवनावर ही झालेला दिसून येतो. पर्यावरणाचा ऱ्हास करुन साधलेला विकास हा काही कामाचा नाही हेही स्पष्ट झाले आहे. त्यामुळे 'शाश्‍वत विकास' करायचा असेल तर पर्यावरणाचे रक्षण करुनच करायला हवा. पर्यावरण रक्षण हा केंद्रबिंदू मानून विकास साधला गेला पाहिजे. सर्वांगीण विकास हा पर्यावरणाचा आत्मा आहे. प्रत्येक प्रदेशांमध्ये पर्यावरणाचे संतुलन चांगल्याप्रकारे राहण्यासाठी जंगलांचे प्रमाण 33 टक्के असावे लागते. परंतु अलीकडे वृक्षतोड केल्यामुळे जंगलांचे प्रमाण कमी होत आहे. मानव हा नैसर्गिक पर्यावरणातील महत्वाचा घटक आहे. पृथ्वीवरील भौगोलिक पर्यावरणाचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विकासाच्या नावाखाली भौगोलिक पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणात केली गेली त्यास सर्वस्वी मानवच जबाबदार आहे. पर्यावरणाच्या या हानीमुळे पृथ्वीवरील सर्व सजीवांना धोका निर्माण झाला आहे. जागतिक तापमानात वाढ, ओझोन वायुचा ऱ्हास, हवामानातील बदल, हवेचे प्रदूषण, जल प्रदूषण, ध्वनीचे प्रदूषण, जमीनीचे प्रदूषण, जंगलांचा ऱ्हास, अनियमित पाऊस, आम्ल पर्जन्य, महापूर, ढगफुटी, दुष्काळ, समुद्राच्या तापमानातील वाढ, वन्य प्राण्यांच्या जाती नष्ट होणे, जैवविविधतेचा ऱ्हास होणे या व आदी गंभीर प्रश्न निर्माण झालेचे दिसून येत आहेत. जर पृथ्वीवरील निसर्ग संपदेचे जतन केले गेले नाही तर पृथ्वीवरील मानवी समुहाचे व संपूर्ण सजीवांचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकेल अशी गंभीर परिस्थिती दिसत आहे. अलीकडच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, औद्योगीकरण, शहरीकरण, लोकसंख्येचीवाढ झाल्यामुळे नैसर्गिक पर्यावरणाची हानी होत आहे. पृथ्वीवरील विविध सजीवांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. जैवविविधतेचा ऱ्हास झाला. प्रदूषण वाढले व त्याचा परिणाम मानवी समूहावर झाला. जागतिक स्तरावर व देशपातळीवर शासन, विविध संघटना व सामाजिक संस्था पर्यावरण रक्षणासाठी पुढे येऊन काम करीत आहेत. निसर्गाचे महत्त्व हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. पृथ्वीवरील नैसर्गिक संसाधने झपाट्याने नष्ट होत आहेत. पर्यावरण रक्षणासाठी योग्य पावले उचलणे आवश्यक आहे. शासन स्तरावर योग्य नियोजन व उपाय सुचवले जातात पण पर्यावरण रक्षण हा आपल्या जीवनशैलीचा भाग बनायला हवा. विकासाच्या नावाखाली होणारी पर्यावरणाची हानी आपण रोखली पाहिजे. भविष्यातील शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे रक्षण करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पर्यावरण संवर्धन करणे हे आपले प्रमुख कर्तव्य आहे. तसे झाले तर निश्चितच शाश्वत विकास होण्यास मदत होईल.
डाॅ युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण अभ्यासक
मो:9923497593