असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर नुकतेच अमीर खान चा 'लालसिंग चड्डा 'आणि अक्षय कुमारचा ' रक्षाबंधन ' हे चित्रपट प्रदर्शित झाले.बॉक्स ऑफिसवर बॉलीवूड मधील या दोन बड्या कलाकारांची टक्कर चालू असताना हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांना जे शोज मिळतात ते ही आता मिळत नाहीत.लाल सिंग चड्डा आणि रक्षाबंधन या चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांचे शोज कमी करण्यात आले असा आरोप मनसे नेते अमेय खोपकर यांनी केला आहे.
मराठीला हक्काचे शोज परत मिळालेच पाहिजेत अशी मागणीही खोपकर यांनी ट्विटरवर केली आहे.गेल्या काही दिवसांपूर्वी 'दे धक्का 2 ', 'एकदा काय झालं ', 'टाईम पास 3' हे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.
अमेय खोपकर काय म्हणाले ?
तुमचे हिंदी चित्रपट जरूर चालवा पण यासाठी मराठी चित्रपटांचा बळी का ? 'लाल सिंग चड्डा' व ' रक्षाबंधन ' या हिंदी चित्रपटांमुळे मराठी चित्रपटांचे हक्काचे शोज का कमी केले जातात.हिंदीवाल्यांची ही मुजोरी कधीही सहन केली जाणार नाही . मराठीला हक्काचे शोज परत मिळालेच पाहिजेत अशी मागणी खोपकर यांनी केली आहे .