rupalichakanakar,mahilaayog; बालविवाह रोखण्यासाठी विवाहकार्यात सहभागी होणाऱ्यांवरही कारवाई करा
schedule01 Mar 24 person by visibility 248 categoryसामाजिक
बालविवाह रोखण्यासाठी विवाहकार्यात सहभागी होणाऱ्यांवरही कारवाई करा
-राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर* rupaliochakanakar
• महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी समाजाने शासनाचे हात बनून पुढे यावे
• सर्व कार्यालयांमध्ये महिला तक्रार निवारण समित्या स्थापन करा
• शाळा, महाविद्यालये, कार्यालयांतील स्वच्छतागृहे स्वच्छ असल्याची तपासणी करा
• युवकांमधील व्यसनाधीनता व गुन्हे रोखण्यासाठी पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा
कोल्हापूर, दि. 1 (जिमाका): बालविवाह balavivah रोखण्यासाठी विवाहकार्यात सहभागी असणाऱ्या सर्वांवर कारवाई करा. लग्नपत्रिका छापणारे प्रिंटिंग प्रेस मालक, विवाह होणारे मंगल कार्यालय व समाज मंदिरांबरोबरच त्या गावचे सरपंच व ग्रामसेवकांवरही कारवाई करा, अशा सूचना देवून हे निर्देश तात्काळ सर्वांपर्यंत पोहोचवा, अशा सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिल्या.
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक झाली, यावेळी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, महानगरपालिका उपायुक्त साधना पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) शिल्पा पाटील, जिल्हा महिला बालविकास अधिकारी एस.एस. वाईंगडे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
श्रीमती चाकणकर म्हणाल्या, जिल्ह्यात अद्याप महिला तक्रार निवारण समित्या स्थापन न झालेल्या आस्थापनांनी तात्काळ समित्या स्थापन करुन तसा अहवाल सादर करावा. सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये स्वच्छतागृहे स्वच्छ असल्याची खात्री करा. बेपत्ता महिला होण्याची प्रकरणे गंभीर असून यासाठी प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक आहे. महिलांची छेडछाड, युवकांमधील व्यसनाधीनता व युवकांशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी समुपदेशनावर भर द्या. सोशल मीडियाच्या वापरामुळेही युवकांमधील गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पालकांनी मुलांशी संवाद वाढवणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
बालविवाह, बेपत्ता महिला, मुलींमधील व्यसनाधीनता, कौटुंबिक हिंसाचार, छेडछाडीच्या घटनांचे प्रमाण कमी होण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न केले आहेत. पण महिलांवरील गुन्हे रोखण्यासाठी नागरिकांनीही सामाजिक बांधिलकी म्हणून एकजुटीने पुढे यावे, असे आवाहन करुन महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचे प्रमाण कमी करुन महिला दिन हा खऱ्या अर्थाने वर्षभर साजरा व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना टाळण्यासाठी भरोसा सेल महत्वपूर्ण कामगिरी करत असून कौटुंबिक समस्या असणाऱ्या महिलांनी भरोसा सेलशी तर संकटात अडकलेल्या महिलांनी निर्भया पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करुन जिल्ह्यातील निर्भया पथकाच्या कामाचे त्यांनी कौतुक केले.
नोकरी करणाऱ्या महिलांसाठीची वसतिगृहे, वन स्टॉप सेंटरची सद्यस्थिती, जिल्ह्यात स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण समित्या, महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे, बेपत्ता महिला व सापडलेल्या महिला, महिलांवरील हल्ले व हिंसाचाराच्या घटना, हरवलेली व सापडलेली बालके, भरोसा सेल, निर्भया पथक, गर्भलिंग निदान व गर्भपात रोखण्यासाठी उपाययोजना व करण्यात आलेली कारवाई या विषयींचा सविस्तर आढावा श्रीमती चाकणकर यांनी घेतला.
जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्यासह संबंधित विभागांनी संबंधित विभागांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
संकटात अडकलेल्या महिलांसाठी निर्भया पथकाचे मोबाईल क्रमांक- शहर विभाग - 9405380133, जयसिंगपूर विभाग 9405016133, गडहिंग्लज विभाग - 9404912133, करवीर विभाग - 9405380133, इचलकरंजी विभाग,- 940530133, शाहूवाडी विभाग - 9067969393 असे असून संकटात सापडलेल्या महिला, मुलींनी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले.