उद्योगजकांशी सरंक्षण क्षेत्रातील संधीबाबत जनरल विनोद खंदारे यांचे मार्गदर्शन
schedule07 Oct 24 person by visibility 148 category
आवाज इंडिया
कोल्हापूर: मेक इन इंडिया अंतर्गत संरक्षण क्षेत्रात उद्योगाच्या संधी विषयावर कोल्हापुरातील उद्योजकांसाठी परिसंवाद आणि खुले चर्चासत्रचे आयोजन करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयचे प्रधान सल्लागार लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे हे यावेळी प्रमुख मार्गदर्शक असणार आहेत. अशी माहिती सतीश डाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मिलिंद आळवेकर म्हणाले, शुक्रवारी 11.10.2024 रेसिडेन्सी क्लब या ठिकाणी सायंकाळी चार ते सात या वेळेत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे हे कोल्हापूर मध्ये मेक इन इंडिया बिझनेस फॅसिलिटेशन सेंटर (उद्योग सुविधा केंद्राच्या) उद्घाटनासाठी येत आहेत, याचे औचित्य साधून रेसिडन्सी क्लब येथे कोल्हापुरातील उद्योगजकांना मार्गदर्शन व खुली चर्चा करणार आहेत. निमंत्रित उद्योजकांसाठी कोल्हापूर इंटरनॅशनल सेंटर हे या चर्चासत्राचे आयोजन करत आले आहे.
कोल्हापुर आणि परिसरात फौंड्री, कास्टिंग, मशिनिंग व तत्सम इंजीनियरिंग सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे जाळे पसरले आहे. सध्या ह्या कंपन्या मुख्यत्वे वाहन उद्योगाशी निगडीत आहेत. वाहन क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक व्हेईकलचा वाढता टक्का हा येत्या नजीकच्या भविष्यकाळात कोल्हापुरातील ऑटो अन्सिलरी क्षेत्राला मारक ठरू शकेल असे या क्षेत्रातील तज्ञांचे मत आहे. पर्यायाने नवीन क्षेत्रामध्ये उतरायचे असेल तर त्या क्षेत्राची माहिती असणे गरजेचे आहे. त्याचबरोबरीने केंद्र शासन आत्मनिर्भर भारत प्रकल्पांतर्गत भारतातील उद्योगांना संरक्षण क्षेत्रामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. त्या अनुषंगाने संरक्षण क्षेत्रामध्ये स्थानिक उद्योजकांसाठी प्रचंड मोठ्या संधी उपलब्ध होत आहेत. सन २०२५ पर्यंत अंदाजे सव्वा दोन लाख कोटी रुपयांच्या संरक्षण क्षेत्राशी संबंधित नव्या व्यवसाय संधी उद्योजकांसाठी खुल्या होणार आहेत असे या क्षेत्रातील तज्ञांकडून सांगितले जाते.
याच अनुषंगाने कोल्हापूर उद्योग क्षेत्राचा भारत सरकारच्या मेक इन इंडिया अंतर्गत विविध सार्वजनिक क्षेत्रातील उपलब्ध होणाऱ्या औद्योगिक संधींच्या माहिती आणि पाठपुराव्यासाठी कायमस्वरूपी उद्योग सुविधा केंद्राची स्थापना होत आहे. लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन १२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. देश पातळीवरील उद्योगाबाबतचे केंद्र शासनाचे निर्णय आणि त्यातील संधी याची संपूर्ण माहिती या निमित्ताने मिळणार आहे. कोल्हापूर व परिसरातील उद्योजकांच्या दृष्टीने ही कार्यशाळा व चर्चासत्र अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. सदर चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी या HTTP//FORMS.GLE/16HC47RIVKSANPSJ7 लिंक ला भेट देऊन रजिस्टर करावे.
अधिक माहितीसाठी Mr. Anurag Kokitkar - 8554889797, CA Yash Shah-9405832510, CA Satish Dakare 9370019933 यांच्या फोन नंबर वर संपर्क करावा.
यावेळी अभय देशपांडे, ओमकार देशपांडे आदित्य भेडेकर उपस्थित होते.