
कोल्हापूर (आवाज इंडिया)
भारतीय संविधानाचे (राज्यघटनेचे) गाढे अभ्यासक व विश्लेषक आणि त्यासाठी अखंडपणे चिंतन आणि लेखन करत त्याद्वारे सरकार दरबारी आणि सवंग भारतीयांना माहितगार बनवण्याची धडपड आणि तशी सुधारणा घडवण्याची पराकोटीची मनीषा बाळगणारे श्री.शरद मिराशी (वय वर्षे:७८) यांची प्राणज्योत आज ६/८/२३ रोजी पहाटे १ वाजता मालवली.
ते मागील दहा दिवसांपासून आजारी होते. महापालिका, माहितीचा अधिकार तसेच एम.आर.टी.पी या कायद्यांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते.पालिका,पोलिस, जिल्हा न्यायालय तसेच जिल्हा प्रशासनाशी ते कायम संपर्क ठेवून होते. प्रशासन व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी ते सतत आग्रही होते. न्यायिक व्यवस्थेतील सुधारणेसंबंधाने दोन वेळा कोल्हापूर ते मुंबई उच्च न्यायालयापर्यंत ते चालत गेले होते.अण्णा हजारेंच्या भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनात ही त्यांचा सक्रिय सहभाग होता. २०१४-१५ ला त्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर "नांदोलन" या पत्रिकेची सुरवात केली होती. पश्चात त्यांनी याच नावाने व्हाटस् अप गृप काढून त्याद्वारे राज्यघटनेच्या साक्षरतेचा आपला प्रयत्न चालु केला व तो शेवटपर्यंत चालु ठेवला. पदविधारक विद्यार्थ्यांना राज्यघटनेची माहिती व्हावी,यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात पॉलिटिकल सायन्स अंतर्गत राज्यघटनेचा ५० मार्कांचा पेपर सुरू करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. राज्यकारभाराप्रति प्रत्येक नागरिकांनी साक्षर असायलाच हवे असा त्यांचा कायम कटाक्ष होता. त्यासाठी प्रारंभी त्यांनी मोफत वर्गही भरवले होते.
त्यांच्या पश्चात त्यांना दोन मुले, सुना, ४ नातवंडे आणि एक बहिण असा परिवार आहे.