जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात ४ दिवसात एकूण २७९ व्यक्तींनी कुणबी पुरावे दाखल केले*
schedule25 Nov 23 person by visibility 127 category

शेवटच्या दिवशी ९७ पुरावे
कोल्हापूर, दि. २४ (जिमाका) : जिल्ह्यातील नागरिकांकडे कुणबी ,मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीबाबतचे उपलब्ध असलेले १९६७ पूर्वीचे पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील शिवाजी सभागृहात स्थापन केलेल्या विशेष कक्षात दि. २१/११/२३ पासून २४/११/२३ पर्यंत ४ दिवसात जिल्ह्यातील एकूण २७९ व्यक्तींनी त्यांचे कडील पुरावे दाखल केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी श्री संजय तेली यांनी दिली.
मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या कामकाजाच्या अनुषंगाने समितीचे अध्यक्ष व सदस्यांचा कोल्हापूर जिल्हा दौरा नियोजित असून या समितीच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांकडे उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी जुनी अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयातील विशेष कक्षात २४ नोव्हेंबर पर्यंत स्वीकारण्यात येणार होते, त्यानूसार २७९ व्यक्तींनी त्यांचे कडील पुरावे दाखल केल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी दिली.