कोल्हापूर : छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मशिनरी आधुनिकीकरणासह 18.5 मेगावॅट क्षमतेचा सहवीज प्रकल्प येत्या 11 महिन्यात पूर्ण करू असे आश्वासन कारखान्याचे चेअरमन अमल महाडिक यांनी दिले.
. राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चाळीसावी वार्षिक सभा शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी झाली. कसबा बावडा येथील कारखाना कार्यस्थळी झालेल्या या सभेत विषय पत्रिकेवरील सर्व नऊ विषय मंजूर करण्यात आले.
या सभेत बोलताना चेअरमन महाडिक म्हणाले, ‘ राजाराम सहकारी साखर कारखाना हा शहरी भागात आहे. कारखाना परिसरात नागरिकीकरण वाढत आहे. यामुळे ऊस क्षेत्र कमी होत आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील 46 गावांमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र वाढवण्याचा निर्णय घेतला. यावरून विरोधकांना का पोटदुखी ? राजाराम कारखाना हा खाजगीकरणातून सहकारीकरणाकडे वळला आहे. तर विरोधकांच्या कारखान्याचे सहकारातून खाजगीकरण होत आहे. यासंबंधी विरोधकांनी त्यांच्या नेतृत्वाला प्रश्न विचारावेत. ‘
सर्व विषय सभासदांनी मंजूर केले. सभासदांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांचे वाचन सुरू असताना काही सभासदाने व्यासपीठांसमोर येऊन, ज्यांनी कारखान्याच्या कार्यकारी संचालकावर भ्याड हल्ला केला तसेच कारखान्याची बदनामी केली त्यांचे सभासद कायमस्वरूपी रद्द करावे असा ठराव मंजूर करावा असा आग्रह धरला. त्यावर चेअरमन महाडिक यांनी सभासदांच्या मागणीची नोंद केली आहे संचालक मंडळाच्या बैठकीत याविषयी निर्णय घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल असे सांगितले.
सभेला कारखान्याचे तज्ञ संचालक माजी आमदार महादेवराव महाडिक , व्हाईस चेअरमन गोविंदा चौगुले, संचालक दिलीप पाटील, दिलीप उलपे, मारुती किडगावकर, तानाजी पाटील, सर्जेराव भंडारे, विलास जाधव, नारायण चव्हाण, संजय मगदूम, विजय भोसले, विश्वास बिडकर, सर्जेराव पाटील, संतोष पाटील, कल्पना पाटील, वैष्णवी नाईक, मीनाक्षी पाटील, सुरेश तानगे, नंदकुमार भोपळे, नेमगोडा पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सत्यजित कदम आदी उपस्थित होते संचालक शिवाजी पाटील आणि आभार मानले. जवळपास पाऊण तास सभा चालली. दरम्यान विरोधी आघाडीच्या वतीने कारखान्याच्या प्रवेशद्वारा बाहेर चेअरमन महाडिक यांच्या कारभारासंबंधी विचारणा करणारे फलक उभारले होते. तसेच कारखाना कामकाजाच्या अनुषंगाने नऊ प्रश्न उपस्थित करत या प्रश्नाच सत्ताधारी उत्तर देतील का असे निवेदन ही वाटप करत होते. विरोधी आघाडीचे मोहन सालपे व इतरांनी प्रवेशद्वाराच्याबाहेर, एकत्र येऊन सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर टीका केली.