थेट पाईपलाईनचे प्रलंबित काम मे अखेर पूर्ण करा; आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांच्या सूचना
schedule06 May 23 person by visibility 146 categoryराजकीय

महानगरपालिका प्रशासनासोबत आढावा बैठक :
कोल्हापूरच्या विविध प्रश्नावर चर्चा
कोल्हापूर : आमदार सतेज पाटील यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या आणि कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याची थेट पाईपलाईन तसचं शहरातील इतर विविध प्रश्न संदर्भात आज आमदार ऋतुराज पाटील आणि आमदार जयश्री जाधव यांनी आज महानगरपालिका प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली. यावेळी महापालिकेच्या प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, माजी नगरसेवक शारंगधर देशमुख, नियाज खान, राजेश लाटकर, आशपाक आजरेकर आदी प्रमुख उपस्थित होते.
थेट पाईपलाईन संदर्भात आढावा घेताना, या प्रकल्पाशी संबंधित प्रलंबित कामे मे अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आमदार ऋतुराज पाटील यांनी दिल्या. वेळ काढू पणा करू नका संबंधितांनी गांभीर्याने घ्यावं, कामातील दिरंगाई खपवून घेणार नाही अशा शब्दातही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कान उघडनी केली. युनिटी कन्सल्टंटचे विजय मोहिते यांनी, बिद्री सब स्टेशन पासून काळमवाडी पर्यंतची वीज कनेक्शन नेण्याची आहे. त्यातील बिद्री साखर कारखान्याच्या इथून चार किलोमीटर अंडरग्राउंड लाईन नेण्याचे काम बाकी असल्याचं सांगितलं. यावर आमदार ऋतुराज पाटील यांनी महावितरण कडून ज्या परवानग्या आवश्यक आहे त्या तातडीने मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. यासाठी सोमवारी 8 तारखेला स्वतंत्र बैठक घेऊ असं देखील त्यांनी सांगितलं. प्रत्येक बैठकीला वेगळा मुद्दा उपस्थित करू नका, बैठकीमध्ये ज्या सूचना केल्या आहेत त्याची पूर्तता करून पुढील बैठकीत याबाबत माहिती देण्याची सूचनाही त्यांनी केली.
आमदार जयश्री जाधव यांनी, जॅकवेलचे काम अद्यापही प्रलंबित असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. जाणीव पूर्वक हा प्रोजेक्ट, संबंधित कंपनी लांबणीवर पाडत आहे काय? अशी विचारणा आमदार जाधव यांनी केली.
एक नंबर जॅकवेलचा टॉपचा स्लॅब 16 दिवसात तर दुसऱ्या जॅकवेलचा फ्लॉवरचा स्लॅब 31 मे पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आमदार जयश्री जाधव यांनी यावेळी दिल्या. या सूचनेनुसार काम करण्याचे आश्वासन युनिटी कन्सल्टंटचे विजय मोहिते यांनी दिले.
नगरोत्थान व दलित वस्ती योजनेतून आम्ही सुचवलेली कामे डावलून इतर कामांची यादी कोणाच्या सांगण्यावरून तयार केली. ती कामे कोणी सुचवलीत आणि आम्ही सुचवलेले कामे डावलण्यामागचे कारण काय अशा प्रश्नाची सरबरात करत आमदार जयश्री जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांनी आज महापालिका प्रशासनाला धारेवर धरले. नगरोत्थान व दलित वस्ती योजनेतील विकास कामाची यादी करताना आम्ही सुचवलेल्या कामाचा समावेश न केल्याबाबत लेखी खुलासा महापालिकेने त्वरित द्यावा अन्यथा अधिकाऱ्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याचा इशारा आमदार जयश्री जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांनी यावेळी दिला.
जिल्हा नियोजन अंतर्गत कोल्हापूर शहरातील विविध विकास कामांसाठी नगरोत्थान व दलित वस्ती योजनेतून निधी मंजूर झाला आहे. या योजनेतून कोल्हापूर शहरातील विविध विकास कामाचे प्रस्ताव आमदार जयश्री जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. दोन्ही आमदारांनी सुचवलेले प्रस्ताव डावलून, या योजनेतील विकास कामांची यादी महापालिका प्रशासनाने तयार केल्याचे बाब आज आढावा बैठकीच्या निमित्ताने निदर्शनास आली. यावेळी दोन्ही आमदारांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.
जनतेतून निवडून आलेल्या आमदारांनी दिलेली विकास कामांची यादी डावलून, जनतेने नाकारलेल्या लोकांच्या सांगण्यावरून विकासकामांची यादी तयार करत असाल तर महापालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर व काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी यावेळी दिला.
आम्ही सुचवले कामे डावलण्यामागची कारणे लेखी स्वरूपात त्वरित द्यावे अन्यथा महापालिका प्रशासना विरोधात हक्क भंग आणण्याचा इशारा आमदार जयश्री जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांनी दिला.
तर सुचवलेली कामे आणि त्यातील प्रत्येक कामाचे नाकारण्याचे कारण याचा लेखी खुलासा उद्या सकाळपर्यंत द्यावा अशी सूचना आमदार जयश्री जाधव व आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रशासनाला दिली.
कोल्हापूर शहरातील पाणीपुरवठा पूर्णता विस्कळीत झालेला आहे. यामुळे नागरिकांच्यातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. पाणी उपसा जास्त होत असतानाही पाणीपुरवठा सुरळीत का होत नाही असा प्रश्न करत आमदार जयश्री जाधव यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. शहरांच्या नागरिकांच्या तक्रारी येत असताना अधिकारी नागरिकांना उडवाउडवीची उत्तर देतात हे बरोबर नाही.
महापालिका प्रशासनाने कार्यप्रणालीत बदल करून त्वरित नागरिकांना योग्य वेळेत पाणी मिळेल तसेच पाणीपुरवठा होत नसल्यास टँकरने सर्व भागात पाणीपुरवठा मिळाले पाहिजे याबाबतचे नियोजन करावे अशी सूचना आमदार जयश्री जाधव यांनी यावेळी दिली.
शहरात पाणी गळतीचे प्रमाण सर्वाधिक आहे. फील्ड वरील शाखा अभियंताना गळती दिसत नाही का असा सवाल शारंग देशमुख यांनी केला. यावर पाणीपुरवठा विभागाच्या वाढत्या तक्रारीबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई त्वरित करावी अन्यथा शाखाधिकारांच्यावरती कारवाई करण्याचा इशारा जल अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी दिला.
महापालिका प्रशासनाने प्लंबर नोंदणी का थांबवली आहे असा सवाल राजेश लाटकर यांनी केला. तसेच नवीन पाणीपुरवठा कनेक्शन घेण्यासाठी स्वतंत्र शाखा अभियंता नेमावा अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली.
शहरातील झोपडपट्टीतील रहिवाशांना महापालिकेने 2007 मध्ये योजनेद्वारे पाणीपुरवठा कनेक्शन दिले होती. या पाणीपुरवठा कनेक्शनचे पाणीबलाची आकारणी महापालिका प्रशासनाच्या त्रुटीमुळे एक वर्षांनी सुरू झाली. परिणामी कनेक्शन धारकांना वाढीव बिलाची आकारणी करण्यात आली. त्यामुळे सदरचे पाणी बिल थकीत आहेत. यासाठी महापालिका प्रशासनाने स्वतंत्र योजना लागू करावी व थकबाकी वरील दंड व व्याज माफ करून, बिल भरण्यासाठी हप्ते द्यावेत अशी मागणी शारंगधर देशमुख यांनी केली.
पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व नाल्यांची सफाई करून घ्या.
नालेसफाई करताना बाजूला ओढून लावलेला कचरा भरून न्या अशा सूचना आमदार जयश्री जाधव यांनी दिल्या. तसेच नालेसफाई झाल्यानंतर कनिष्ठ अभियंता, स्थानिक नागरिक व आरोग्य निरीक्षक यांनी जागेवर पाहणी करून सह्या घ्या अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कोल्हापूर पंचगंगा स्मशान भूमीच्या नूतनीकरण कामाच्या सद्यस्थितीची माहिती घेताना, यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील साहेब आणि मी प्रत्येकी 50 लाखाचा निधी दिला होता, तो का नाकारलात. जिल्हा नियोजन समितीचे नियमाप्रमाणे 25 लाखाचा निधी घेतला असता तर आता 50 टक्के काम झाले असते. तो दोन टप्प्यात प्रत्येकी 25 लाखाचा निधी घेतला असता तर आज स्मशानभूमीच्या रूप पालटले असता असे मत आमदार जयश्री जाधव यांनी व्यक्त केले.
यावेळी विशेष अनुदान मधुन मंजुर केलेल्या ५ ठिकाणच्या अभ्यासिका रु.४ कोटी, साळोखेनगर विरुंगळा केंद्र रु.३ कोटी व कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान नजीक स्विमींग टँक आदी कामाबाबत चर्चा झाली.
कोल्हापूर शहरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामधून कोणत्या रस्त्यांची कामे होणार आहेत याबाबतची माहिती घेतली. या कामाचे वर्क ऑर्डर एकत्र काढण्याचे आदेश शासनाने दिल्याचे सांगण्यात आले. परंतु नगरोत्थान योजना 2007-08 मध्ये अशाच प्रकारे रस्त्यांच्या कामासाठी बाहेरील एकाच ठेकेदाराची नेमणूक करण्यात आली होती. एकाच ठेकेदाराला सर्व कामे दिल्यानंतर कामे योग्य वेळेत पूर्ण झाली नाहीत. तसेच कामाचा दर्जाही राहिला नाही आणि याचा आर्थिक भुर्दंड ही महानगरपालिकेला सहन करावा लागला होता. मागील अनुभव पाहता, यावेळी प्रत्येक कामासाठी स्वतंत्र ठेकेदाराची नेमणूक करावी आणि हे काम स्थानिक स्थानिक ठेकेदारांनाच देण्यात यावे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध होईल अशी सूचना आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, जल अभियांता नेत्रदीप सरनोबत, सहाय्यक आयुक्त विजय पाटील, उप शहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता नारायण भोसले, एन एस पाटील यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.