धनश्री मोहिते विद्यार्थीकेंद्रित अध्यापनाची उज्ज्वल परंपरा
schedule28 Nov 25 person by visibility 7 categoryशैक्षणिक
कोल्हापूर :
सेंट झेविअर्स हायस्कूल, नागाळा पार्क (इंग्रजी माध्यम) येथील बहुगुणी व प्रयोगशील शिक्षिका सौ. धनश्री श्रीराम मोहिते या आपल्या सर्जनशील अध्यापन पद्धती, नाट्यकलेतील आवड, सामाजिक जाणिव आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांमुळे शिक्षणक्षेत्रात विशेष ठसा उमटवत आहेत. मराठी विषयाची गोडी इंग्रजी माध्यमातील मुलांना लागावी म्हणून त्यांनी अंमलात आणलेल्या नावीन्यपूर्ण पद्धतींमुळे त्या महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण गौरव पुरस्कारासाठी पात्र मानल्या जात आहेत.
मराठी विषयाचे प्रभावी अध्यापन करण्यासाठी माहितीपट, लघुपट, नाटिका, मुलाखती, गटचर्चा, अनुभव लेखन अशा विविध माध्यमांचा वापर करून त्या अभ्यास अधिक समजण्यासारखा आणि आनंददायी करतात. श्रवण, संभाषण, वाचन व लेखन या चारही कौशल्यांचा विकास होण्यासाठी कृतीआधारित अंतर्गत उपक्रम सातत्याने राबविल्याने विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व अभिव्यक्तीशक्ती वाढली आहे.
मोहिते मॅडमांनी राबविलेल्या ‘गोष्टरंग’ या विशेष नाट्यप्रयोगामुळे विद्यार्थ्यांमध्ये साहित्य-अभिरुची आणि नाट्यकलेबद्दल आकर्षण निर्माण झाले. शाळेच्या वार्षिक अंकासाठी मुलांना लेखनाची प्रेरणा देणे, विविध चित्रपट व माहितीपटांचे सत्र घेणे, तसेच पन्हाळा ते पावनखिंड ही ऐतिहासिक मोहीम ९० विद्यार्थ्यांसह यशस्वीरीत्या पूर्ण करणे हे त्यांचे उल्लेखनीय उपक्रम आहेत.
विद्यार्थ्यांचे मानसिक, भावनिक व सामाजिक प्रश्न समजून घेऊन त्यांना सुसंवादातून आधार देणे, मूल्यांवर आधारित उपक्रम घेणे आणि पालक-विद्यार्थी-शिक्षक हा त्रिकोण कृतिशील ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे ही त्यांची कार्यशैली शिक्षणातील आदर्श निर्माण करणारी आहे.
फक्त शैक्षणिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक कार्यातही त्या उल्लेखनीय योगदान देत आहेत. वयात येणाऱ्या मुलींसाठी मार्गदर्शन सत्र, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील सहभाग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मदत, तसेच कोरोनाकाळात २५ कुटुंबांना अन्नधान्य व कपड्याचे वाटप असे अनेक उपक्रम त्यांनी हाती घेतले आहेत.
नाट्यस्पर्धांमध्ये वारणा महाविद्यालय पातळीवरील प्रथम क्रमांक, बेळगाव क्रोनोझ स्पर्धेत प्रथम क्रमांक, शिवाजी विद्यापीठाचा कोजिम प्रेरणा पुरस्कार, अप्पासाहेब विद्यार्थी भवनचा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार, तर नरेंद्र विद्यापीठाचा सृजनशील लेखन पुरस्कार अशा मान्यतांनी त्यांच्या कार्याला योग्य तो सन्मान मिळाला आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधत शिक्षण-अध्यापनाला सर्जनशीलतेची जोड देणाऱ्या आणि सामाजिक जाणीवेने काम करणाऱ्या सौ. धनश्री मोहिते या शिक्षिका महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कारासाठी योग्य व पात्र असल्याचे शिक्षणवर्तुळात सांगितले जात आहे.