एक ऑक्टोबर पासून कोल्हापूर- मुंबई मार्गावर दररोज विमानसेवा सुरू होणार,
schedule17 Aug 23 person by visibility 127 category

कोल्हापूर आवाज इंडिया
कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर आहे. कोल्हापूरच्या विमानतळाचा जलद गतीने विकास होत असतानाच, आता कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर दररोज विमानसेवा उपलब्ध होणार आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा करून, कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर सोयीस्कर वेळेत दैनंदिन विमानसेवा सुरू करण्यात यश मिळवले आहे. १ ऑक्टोबर 2023 पासून, स्टार एअर या नामांकित कंपनीकडून, कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर दैनंदिन विमानसेवा सुरू होत आहे. आठवड्यातील सातही दिवस मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत असल्याने व्यापारी, उद्योजक, कलाकार, खेळाडू अशा सर्वांचीच मोठी सोय होणार आहे. १ ऑक्टोबर पासून स्टार एअर कंपनीकडून ही दैनंदिन विमानसेवा सुरू होईल. त्यानुसार रोज सकाळी साडेनऊ वाजता मुंबईहून कोल्हापूरच्या दिशेने विमान उड्डाण करेल आणि सकाळी साडेदहा वाजता हे विमान कोल्हापुरात येईल. त्यानंतर सकाळी दहा वाजून पन्नास मिनिटांनी, कोल्हापूर विमानतळावरून मुंबईच्या दिशेने विमान झेप घेईल आणि सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान मुंबई विमानतळावर उतरेल त्यामुळे दिवसभरातील मुंबईतील कार्यालयीन कामे करणे सर्वांनाच सोयीचे ठरणार आहे. आठवड्यातील सातही दिवस मुंबई - कोल्हापूर- मुंबई या मार्गावर विमानसेवा सुरू होत असल्याने, निश्चितच कोल्हापूरच्या औद्योगिक प्रगतीला चालना मिळेल, असा विश्वास खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.