श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभावाची शिकवण*
schedule06 Feb 25 person by visibility 155 categoryसामाजिक

*श्रमसंस्कार शिबिरातून सेवाभावाची शिकवण*
-सैनिक गिरगाव सरपंच महादेव कांबळे यांचे प्रतिपादन
-डी. वाय. पाटील अभियांत्रीकी एनएसएसचे ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबीर उत्साहात
श्रमसंस्कार शिबिरातून सामाजिक बांधिलकीची भावना व सेवाभाव वृत्तीची शिकवण प्राप्त होते. या माध्यमातून समाजसेवेचे मोठे कार्यही घडत असल्याचे प्रतिपादन सैनिक गिरगावचे सरपंच महादेव कांबळे यांनी व्यक्त केले. डी. वाय. पाटील अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागाच्यावतीने सैनिक गिरगाव येथे आयोजित ७ दिवसीय श्रमसंस्कार शिबीरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी उपसरपंच शुभांगी कोंडेकर, शाळा समिती अध्यक्ष विशाल जाधव, विद्या मंदिर गिरगाव च्या मुख्याध्यापिका कविता पाटील, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राहुल पाटील, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्पाधिकारी प्रा. योगेश चौगुले, डॉ. गणेश पाटील, इंद्रजीत जाधव, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
डॉ. राहुल पाटील म्हणाले, या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडून येतो. आपण समाजाचे देणे लागतो हो भावना नेहमी ठेवावी. एनएसएसच्या माध्यमातून समाजाची जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करावा.
युवकांचा ध्यास, ग्राम-शहर विकास या ब्रीदवाक्याखाली हे श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले होते. या विशेष शिबिरामध्ये शिबिरार्थीनी योगासने, श्रमदान, बौद्धिक सत्र, आरोग्य शिबिर, डेंगू मलेरिया जनजागृती, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पाणी तपासणी, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये जनजागृती केली.
*विद्यामंदिर गिरगाव सीसीटीव्ही कॅमेरा भेट*
विद्यामंदिर गिरगाव या शाळेला डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी कडून दोन सीसीटीव्ही कॅमेरा सिस्टीम भेट देण्यात आल्या. राष्ट्रीय सेवा योजनेचे सर्व स्वयंसेवक आपल्या आपल्या वाढदिवसाला एनएसएस विभागाला एक पुस्तक भेट देतात. बालवाडीच्या विद्यार्थ्यांपासून ते एमपीएससी यूपीएससीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील अशी पुस्तके या उपक्रमातार्गत जमा झाली आहेत. त्यातील बालवाडी ते सातवीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी पडू शकतील अशी 200 हून अधिक पुस्तके विद्या मंदिर गिरगाव यांना भेट देण्यात आली.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आ. सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लीतेश मालदे यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले.