कोल्हापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्यावतीने शुक्रवारी पत्रकार दिन
schedule05 Jan 23 person by visibility 287 categoryउद्योग

*उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान*
कोल्हापूर, दि. ४ : कोल्हापूर डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या वतीने शुक्रवारी, दि. ६ जानेवारीला मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती दिनी होणाऱ्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून पत्रकार दिन साजरा करण्यात येणार आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ११.०० वाजता कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन (मिनी हॉल) येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून संघटनेच्या वतीने पत्रकारिता व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरानांही सन्मानित करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील आणि उपाध्यक्ष भाऊसाहेब फास्के यानी आज पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकार दिनानिमित्त सन्मानित करण्यात येणारे ज्येष्ठ पत्रकार नाना पालकर यांना जीवन सन्मान पुरस्कार तर तब्बल तीस वर्षे पत्रकारीतेत कार्यरत असतानाच डिजिटल माध्यम क्षेत्रातदेखील उत्कृष्ट कामगिरी करणारे पत्रकार नवाब शेख ( लाइव्ह चोवीस तास न्यूज नेटवर्क) यांना आदर्श पत्रकार,अजय शिंगे (मीडिया कंट्रोल न्यूज) यांना उत्कृष्ट नवोदित पत्रकार पुरस्कार, नरेंद्र देसाई ( उत्कृष्ट व्हिडिओ एडिटर), नाजीम आत्तार ( उत्कृष्ट कॅमेरामन ) या पत्रकारांसह सामाजिक क्षेत्रातील योगदान देणारे माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. विजय भोजे यांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.