*44 व्या बुद्धिबळ ऑलंपियाड साठी कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांची पंच म्हणून नियुक्ती*
कोल्हापूर बुधवार दि. 20 जुलै:-
यावेळी भारतात चेन्नई (महाबलीपुरम्) येथे 28 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान 44 व्या बुद्धिबळ ऑलंपियाड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक बुद्धिबळ संघटना (फिडे) व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना (ए आय सी एफ) यांच्या संयुक्त प्रयत्नातून व तमिळनाडू शासनाने पुरस्कृत केल्यामुळे या स्पर्धा पहिल्यांदाच भारतात होत आहेत.जगातील या सर्वात मोठ्या व महत्त्वाच्या स्पर्धेसाठी कोल्हापूरचे आंतरराष्ट्रीय पंच भरत चौगुले यांना सामना पंच म्हणून नियुक्त केल्याचे जागतिक बुद्धिबळ संघटनेचे(फिडे) पत्र मिळाले आहे. यापूर्वी त्यांनी राज्य, राष्ट्रीय,आशियाई,राष्ट्रकुल व जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेत पंच म्हणून काम केले आहे.असा बहुमान मिळवणारे कोल्हापूर जिल्ह्यातील ते पहिलेच बुद्धिबळ पंच आहेत.
दर दोन वर्षांनी होणाऱ्या या बुद्धिबळ ऑलंपियाड स्पर्धेचे यावेळचेे वैशिष्ट्य म्हणजे विक्रमी देशांचा सहभाग, यावेळी 187 देशांचा सहभाग या बुद्धिबळ ऑलंपियाड मध्ये झाला आहे. या स्पर्धा खुल्या व महिला गटात स्वतंत्र पणे स्विस् लिग पद्धतीने एकूण 11 फेऱ्यात सांघिक प्रकाराने होणार आहेत.188 संघ खुल्या गटात तर 162 संघ महिला गटात सहभागी झाले आहेत.
जगजेत्ता नॉर्वेचा मॅग्नस कार्लसनसह जगातील सर्वोत्तम1750 बुद्धिबळपटू त्यांचे प्रशिक्षक व व्यवस्थापक व 205 नियुक्त केलेले पंच मिळून जवळपास 2200 प्रतिनिधी या सर्वांचे राहण्याचे जेवणाचे उत्तम व्यवस्था अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनाच्या स्पर्धा व्यवस्थापन समितीने व तामिळनाडू शासनाने केली आहे.एकूण नियुक्त केलेल्या 205 आंतरराष्ट्रीय पंचापैकी 90 आंतरराष्ट्रीय पंच भारतातील आहेत त्यापैकी महाराष्ट्रातील अकरा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ पंचांची निवड झाली आहे.
भरत चौगुले हे गेली 35 वर्ष बुद्धिबळ संघटक,संयोजक,प्रशिक्षक व पंच म्हणून कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. या निवडीसाठी भरत चौगुलेना भारतीय बुद्धिबळ संघटनेचे सल्लागार व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे माजी अध्यक्ष अशोकभाऊ जैन,
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष डॉ.परिणय फुके,कार्याध्यक्ष सिद्धार्थ मयूर,उपाध्यक्ष ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे,गिरीश चितळे व सचिव निरंजन गोडबोले यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.