यंदाचा पुरुषोत्तम करंडक कोणालाही नाही; दिग्दर्शक विजू मानेंनी केला निर्णयाचा निषेध
schedule19 Sep 22 person by visibility 274 categoryलाइफस्टाइल

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित पुरुषोत्तम करंडकाचे यंदा 57 वे वर्षे होते या आजवरच्या 57 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच पुरुषोत्तम करंडकासाठी एकही एकांकिका पात्र न आढळल्याने पुरुषोत्तम करंडक कोणालाही दिला गेला नाही. पी. आय. सी टी च्या ' कलिगमन ' या एकांकिकेला फक्त रोख पारितोषिक दिले गेले. मात्र पुरुषोत्तम करंडक दिला गेला नाही.दिग्दर्शन, वाचिक अभिनय, सर्वोत्तम अभिनय या विभागांमध्ये पात्र कलाकार नसल्याने पारितोषिक कोणालाही जाहीर केले नाही असे परीक्षक म्हणाले. या निर्णयाचा सुप्रसिद्ध दिग्दर्शक विजू माने यांनी निषेध केला आहे. त्यांनी याबाबतची पोस्ट फेसबुक वर शेअर केली आहे.
काय म्हणाले विजू माने -
मी या निर्णयाचा निषेध करतो. मी ही एकांकिका स्पर्धा पाहिली नाही त्यामुळे एकांकिकांच्या दर्जा बद्दल मी काही बोलणार नाही. परंतु अशा या वृत्तीचा मला नेहमी राग येतो. मुळात दर्जा असलेल्या एकांकिका हव्या आहेत असं जर परीक्षकांना वाटत असेल तर परीक्षकांनी प्राथमिक फेरीतच दर्जेदार एकांकिका नाहीत म्हणून स्पर्धा होणार नाहीत असं जाहीर करून टाकावं . म्हणजे दिवस - रात्र एकांकिकेसाठी प्रयत्न करणाऱ्यांचा विनाकारण हिरमोड होणार नाही. असे ते आपल्या फेसबुक पोस्टमध्ये लिहितात.
पुढे ते लिहितात, ज्या लोकांमध्ये स्पर्धा आहे त्या लोकांमधला जो उत्तम आहे त्याला पहिला क्रमांक द्या. तुम्ही तरी तुमच्या शाळेत शंभर पैकी शंभर मार्क कधी मिळवले होते का? पण म्हणून एखाद्या वर्गात 65 मार्क मिळवणारा मुलगा सर्वोच्च मार्क मिळवणारा असेल तर त्याला पहिला क्रमांक द्यायचा नाही याला काही अर्थ आहे का? मी एकांकिका करीत असतानाही असं वाटायचे की आधी परीक्षकांची नावे जाहीर करा मग आम्ही तशी एकांकिका सादर करू. आजही दिवस काही फारसे बदललेले नाहीत.
विजू माने यांच्या या पोस्टवर अनेक फेसबुक युजर्सनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.एकांकिका स्पर्धांचे नियम आता काळानुरूप बदलायला हवेत असे एका युजर ने लिहिले आहे.अभिनेता संतोष जुवेकर यानेही विजू माने यांच्या पोस्टवर सहमती दर्शवली आहे.