महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे अमेरीकेत व्यापार परिषदेचे आयोजन
schedule06 Aug 22 person by visibility 2567 categoryलाइफस्टाइल
11 ते 14 ऑगस्ट या काळात अटलांटीक सिटी येथे आयोजन
कोल्हापूर ः इन्व्हेस्ट इन महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन अमेरीकेत राहणारे भारतीय उद्योजक, गुंतवणुकदार, विशेषतः महाराष्ट्रीयन उद्योजक, गुंतवणुकदार यांनी महाराष्ट्र संयुक्त उद्योग उभारावेत, नवीन गुंतवणुक करावी तसेच आधुनिक तंत्रज्ञान पुरवावे या उद्देशाने राज्यातील व्यापार, उद्योग, सेवा व कृषि उद्योग क्षेत्राची शिखर संस्था महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर तसेच अमेरीकेतील महाराष्ट्रीय लोकांची संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभागाच्या सहकार्याने अमेरीकेतील अटलांटीक सिटी, न्यु जर्सी येथे 11 ते 14 ऑगस्ट 2022 या काळात बिझकॉन या बिझनेस कॉन्फरन्स चे आयोजन केले असल्याची माहीती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.
स्वातंत्र्यपुर्व काळापासुन महाराष्ट्राच्या औद्योगिकरणाचा पाया रचणार्या व शतकमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर ने सातत्याने राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्रातील युवा, महिला उद्योजक, विविध लहान मोठे उद्योग यांना व्यवसायाच्या नवीन संधी बरोबर निर्यातीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र चेंबर चे सध्या 23 देशांशी सामंजस्य करार आहेत.
या प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणजेच या व्यापार परिषदेचे आयोजन आहे. जगाची महासत्ता म्हणुन ओळख असलेला अमेरीका देश तंत्रज्ञान, गुंतवणुक या क्षेत्रात जगात आघाडीवर आहे.
अमेरीकेच्या विकासात भारतीय, महाराष्ट्रीयन लोकांचा मोठा सहभाग आहे.
या सर्वांच्या माध्यमातुन महाराष्ट्रात नवीन गुंतवणुक नवीन उद्योग, जॉइंट व्हेंचर्स, स्टार्ट अप्स ना भांडवल व तंत्रज्ञान मिळविण्यासाठी महाराष्ट्र चेंबरने बृहन्महाराष्ट्र मंडळ जे 40 वर्षापासुन अमेरीकेतील महाराष्ट्रीयन बांधवांची संस्था म्हणुन कार्यरत आहे. अशा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने येथे ही व्यापार परिषद, व्यापार प्रदर्शन आयोजित केले आहे.
महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली 50 उद्योजकांचे व्यापक शिष्टमंडळ 09 ऑगस्ट रोजी अमेरीकेला रवाना होणार आहे.
अमेरीकेच्या विविध राज्यातील 4500 हुन अधिक महाराष्ट्रीयन, भारतीय व अमेरीकन उद्योजकांनी या परिषदेसाठी उपस्थित राहण्याची नोंदणी केली आहे.
अटलांटीक सिटी येथील व्यापार परिषदेनंतर महाराष्ट्रीयन उद्योजकांचे शिष्टमंडळ वॉशिंग्टन डीसी व न्युयॉर्क या शहरांना भेटी देणार असुन तेथील चेंबर ऑफ कॉमर्स समवेत बैठकांमध्ये सहभागी होणार आहे.
पत्रकार परिषदेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे गव्हर्निंग काऊन्सील मेंबर संजय पाटील, जयेश ओसवाल, संजय शेटे, एमएसएमई समितीचे को चेअरमन प्रकाश मालाडकर सहभागी झाले होते.