...अन्यथा पोरं मेल्यावर म्हणायचं असं व्हायला नको होतं
schedule13 Feb 23 person by visibility 706 categoryलाइफस्टाइल
रविवार म्हटले की, बुद्धिबळ स्पर्धा असतात. मुलाला बुद्धिबळ स्पर्धेसाठी मी सोडायला गेलो होतो. माझी तब्येत थोडी बरी नव्हती म्हणून म्हटलं सोडून परत यायचं. शिरोलीतील रुक्मिणी हॉल पासून सांगली फाटा जायचे का तावडे हॉटेल यायचं या विचारात मी बाहेर पडलो.
दरम्यान एक वाटसरू भेटले मला.
मी त्यांना विचारलं "सांगली फाटा जवळचा का तावडे हॉटेल" मला ते म्हणाले, "तावडे हॉटेल, चला पाच मिनिटात चालत जाईल"
मी म्हटलं, "मला वाटते तावडे हॉटेल लांब होईल, मी इकडे शिरोली सांगली फाट्यावर जातो". त्यांचा आग्रह ते व्यायाम करायला आले होते. त्यामुळे त्यांना असं वाटत होतं की माझाही थोडा व्यायाम व्हावा म्हणून ते म्हणाले, "चला तावडे हॉटेल जवळ आहे, पाच मिनिटात तुम्ही अंतर पार कराल".
चालत असताना गप्पा गोष्टी सुरू झाल्या. मी विचारलं, "किती तास व्यायाम करता. त्यांनी सांगितलं "सकाळी पाच ते आठ किलोमीटर चालतो, आता पेन्शनर आहे तब्येत सांभाळायची मुला -मुलीची लग्न झालेली आहेत". मग मला विचारलं "तुम्ही काय करता".मी म्हटलं 'पत्रकार आहे' मग त्यांनी बी न्यूजच्या एका पत्रकाराचे नाव सांगितलं;जो माझ्या ओळखीचा नव्हता. मी म्हटलं मी त्यांना ओळखत नाही.
मग दुसऱ्या विषयाला सुरुवात झाली ते सांगू लागले "मुलीचं लग्न झालंय ते आंतरजातीय. काय नसतं जाती-जातीत. सुरुवातीला घरात विरोध झाला मात्र नंतर आम्ही बघितलं तर सगळे चांगले आहे. मुलाच्या घरची तर सगळे चांगले आहेत. मुलगा चांगला आहे, मुलगी चांगली आहे, मुलीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठात पोस्ट पदवीधर झाल्यामुळे ती तिचा निर्णय घेण्यास स्वातंत्र आहे. म्हणून आम्ही नंतर तिला प्रोत्साहन दिले तिच्यासाठी ठेवलेली रक्कम सुद्धा तिला देऊ केली. आंतरजातीय विवाह केला म्हणून काय झालं शेवटी ती सुद्धा माणसंच आहेत असे सांगितल्यानंतर त्या बापाकडे मला एकसारखं बघावसं वाटलं.
एकीकडे मनाजोगं लग्न झालं नाही म्हणून मुलीचा खून करणारे बाप बघितले आणि दुसरीकडे काय नसते सगळी माणसंच असतात काही होत नाही असं म्हणत
आंतरजातीय विवाह पाठिंबा देणारा आणि मुलीवर सातत्याने प्रेम करणारा बाप बघितला. त्यांना मी सलाम केला.
पंचगंगा फुलावर आल्यावर मला म्हणाले, 'थोडा वेळ थांबा'.त्यांनी सूर्यनमस्कार घातला. लगेच मोबाईल काढून मी त्यांचा तो क्षण क्लिक केला. फोटो कसा आलाय बघायच्या नादात त्यांनी नदीला नमस्कार केलेला फोटो मात्र काढता आला नाही.
"आता ओमनी आहे फक्त मुलीकडे ये -जा करण्यासाठीच आहे. आता आम्ही सर्वजण बोलून चालून असतो सुखाने समाधानाने आनंदाने. ह सांगायला ते विसरले नाहीत.
एका मानवापासून सर्वांची निर्मिती झाली असताना सुद्धा आज या जातीचा मी त्या जातीचा म्हणून हिणवले जाते आडनाव बघून तोंड वाकडी करणारी माणसे या जगात आहेत आणि दुसरीकडे आंतरजातीय विवाहाला पाठिंबा देणारे बाप ज्यावेळी बघतो त्यावेळी खरंच काहीतरी प्रकाशाची चाहूल लागते आणि मग अंधारात जाती- जातीच्या ज्यांच्यावर अन्याय होतो ते मात्र या प्रकाशाकडे आशेने बघत असतात.
नंतर त्या त्यांच्या मुलीचे नाव सांगितले ती बिचारी माझ्याकडे उपसंपादक म्हणून काम करत होती. मी त्यांना म्हटलं तुमची मुलगी खूप हुशार आहे. मी अनेकांना तिच्या संदर्भ दिला खरंतर मला ती कायमच उपसंपादक हवी होती. मात्र नंतर ती घरी असल्याकारण माझा नाईलाज झाला तरीही ज्यांना घरी काम करून हवे होते त्यांना मी तिचा संदर्भ दिला होता.
14 फेब्रुवारी जवळ येत आहे सगळीकडे प्रेमाचा बोलबाला केला जात आहे. माझं कायम मत आहे.कुठलाही भेदभाव न मानता केलेले प्रेम ते ग्रेट प्रेम असतं. अन्यथा श्रीमंत- श्रीमंत, गरीब- गरीब त्याच -त्याच जातीतील लग्न यापेक्षा श्रीमंत -गरीब आंतरजातीय विवाह समाजाला बरंच काय देऊन जातात.
प्रेमात काय कोणी पडतं पण आंतरजातीय प्रेमाला बाप साथ देतो सगळे कुटुंब मुलीच्या संसारात प्रेमात पडतं त्या कुटुंबाचा प्रमुख बाप मला भेटतो नक्कीच मला त्यांच्या आदर्श वाटतो. मुलांना जन्म देणे म्हणजे त्यांनी प्रत्येक श्वास आपल्या इच्छे प्रमाणे घेणं असं नव्हे असाही त्यांनी मला संदेश दिला.
पारंपारिक रूढीला छेद देत परिवर्तनवादी विचाराला प्रोत्साहन दिले तर नक्कीच सर्वांनाच प्रेम, आपुलकी, माया मिळते हे या उदाहरणावरून दिसते. मुलांनी आंतरजातीय विवाह केला म्हणून द्वेष, राग, भांडण केल्यापेक्षा त्यांच्यावर प्रेम करून आयुष्यभर सुखाने राहिलेलं कधीही चांगलंच.अन्यथा पोरं मेल्यावर म्हणायचं असं व्हायला नको पाहिजे होतं. यावेळची वाट न बघितलेली बरं.
प्रशांत चुयेकर