
कोल्हापूर (प्रतिनिधी) : धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा कोल्हापूरातील राजर्षी शाहुंच्या समतावादी नगरीतील नावाजलेल्या मानाच्या व सन्मानाच्या राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कारासाठी प्रा बसवंत मल्लाप्पा पाटील , मूळ रा. चिंचणे , ता चंदगड सध्या रा कसबा बावडा यांची निवड करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा ॲड. करुणा विमल यांनी दिली.
राजर्षी शाहुंच्या विचारांना आदर्श मानून सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व जनसेवेच्या विविध क्षेत्रात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असलेले प्रा पाटील यांना सामाजिक बांधिलकी मानून ते करीत असलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केल्याचे ॲड. करुणा विमल यांनी सांगितले.
धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्ट ही संस्था तथागत बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, माता सावित्रीमाई फुले, लोकराजे राजर्षी शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी अभिप्रेत असणाऱ्या प्रबोधनाच्या चळवळींमध्ये कार्यरत आहे.
राजर्षी शाहू प्रेरणा पुरस्कार-2023 या पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, सन्मानचिन्ह आणि तीन हजार रुपयांची पुस्तके असे असून या पुरस्काराचे वितरण रविवार दि. 18 जून, 2023 रोजी दुपारी 12:00 वा. राजर्षी शाहू स्मारक भवन, कोल्हापूर येथे होणाऱ्या राजर्षी राष्ट्रीय बाल लघु चित्रपट महोत्सवात मा. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, मा. आमदार जयंत आसगावकर, विद्रोही शाहीर संभाजी भगत, प्रा. बाबुराव गुरव, अभिजित बिचुकले, प्रा. टी. के. सरगर, विजया कांबळे, छाया पाटील, दिग्दर्शक माहेश्वर तेटांबे, फोटोग्राफर राजवीर जाधव, अमर पारखे आदी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
पत्रकार परिषदेला डॉ. निकिता चांडक, डॉ. स्नेहल माळी, अनिरुद्ध कांबळे, अरहंत मिणचेकर, नामदेव मोरे, अनघा सुतार, अनुष्का माने उपस्थित होते.
या पुरस्कार वितरण समारंभास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ॲड. करुणा विमल यांनी केले आहे.