*
कोल्हापूर (आवाज इंडिया प्रतिनिधी)
*महाडिक यांच्या भेटीनंतर तातडीने शासकीय मदतीत वाढ*
गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी भुदरगड तालुक्यातील दारवाड, लोटेवाडी, बसरेवाडी परिसरातील शेतकऱ्यांच्या लंपी आजाराने बाधित गोठ्यांना नुकतीच भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन, तात्काळ राज्याचे दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधला व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची अपुरी संख्या तसेच औषधाचा तुटवडा यासारख्या शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. शौमिका महाडिक यांच्या मागणीची तातडीने दखल घेत एका दिवसामध्येच राज्य सरकारने भुदरगड तालुक्यासाठी वाढीव पशुवैद्यकीय अधिकारी व पर्यवेक्षक उपलब्ध करून दिले आहेत.
गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे 2 दिवसापूर्वी भुदरगड तालुक्याच्या दौऱ्यावर गेले असता शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर समस्या मांडल्या होत्या. यावेळी समस्यांचे निराकरण करण्याऐवजी हात झटकत "गोकुळ तुम्हाला मदत करू शकत नाही, शासनाकडून मदत घ्यावी", असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने अध्यक्ष व इतर संचालकांना तिथून काढता पाय घ्यावा लागला होता. याची तातडीने दखल घेत शौमिका महाडिक यांनी शासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. व शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग सुकर केला.
याचबरोबर लंपीबाधित जनावरांसाठी विलगीकरणाची सोय करण्यात यावी, यासाठी शौमिका महाडिक यांनी आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले. यामुळे लंपीच्या प्रसारास पायबंद बसेल व डॉक्टरांनादेखील एकाच ठिकाणी उपचार देणे सोयीस्कर होईल. गोठ्यामध्ये जागेची कमतरता असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांना लंपीबाधित जनावरांचे विलगीकरण शक्य होत नाही. याबाबतदेखील लवकरच उपाययोजना करण्याची ग्वाही महाडिक यांनी शेतकऱ्यांना दिली होती.
दौऱ्यावेळी गोकुळचे माजी संचालक धैर्यशील देसाई, भुदरगड पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकारी डॉ.माधव मेटांगळे, दारवाडचे सरपंच शामराव मोहीते, प्रताप पाटील, बाळकृष्ण रेडेकर,मोहन भारमल, सुभाष मोहीते, बाळासो केंगार, दत्तात्रय टोणपे,दिनकर मिटके, गणपतराव कुंभार, अतुल शिनवे, रविंद्र मोहीते, संजय कुंभार, नामदेव सारंग, दत्तात्रय सारंग, उदय दळवी,अश्विन मोरे,साताप्पा पाटील, विठ्ठल पाटील, धनाजी पाटील, सुभाष पाटील, अभिजित देवेकर, अर्जुन खापरे, बाबुराव पाटील यांच्यासह इतर दुध उत्पादक सभासद व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.