स्नेहल सचिन घाडीगावकर यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार
schedule06 Nov 25 person by visibility 21 categoryशैक्षणिक
कोल्हापूर :
शिरोली पुलाची (ता. हातकणंगले) येथील कौतुक विद्यालयाच्या सहायक शिक्षिका सौ. स्नेहल सचिन घाडीगावकर यांना “महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे उल्लेखनीय कार्य, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत हा सन्मान त्यांना मिळाला आहे.
प्रसिद्ध सामाजिक संस्था कृती फाउंडेशन यांच्यावतीने 28 नोव्हेंबर रोजी त्यांचा कोल्हापुरात सत्कार समारंभ होणार आहे.
सौ. घाडीगावकर यांनी आतापर्यंत एकूण 18 वर्षे अध्यापन सेवा बजावली असून त्यापैकी 14 वर्षे कौतुक विद्यालय शिरोली पुलाची येथे कार्यरत आहेत. त्यांनी मराठी, हिंदी व अर्थशास्त्र या विषयात एम.ए., बी.एड. अशी शैक्षणिक पात्रता संपादन केली आहे.
अध्यापन अधिक प्रभावी करण्यासाठी त्या वर्गात विविध उपक्रमाधारित पद्धती वापरतात. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी म्हणून स्वतः वाचलेल्या पुस्तकातील उदाहरणे देतात, गृहभेटी घेतात, पालकसभांचे आयोजन करतात आणि विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन करतात. मोबाईल व YouTube सारख्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांनी ऑनलाइन अध्यापन क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले आहे.
सामाजिक जाणिवेतून त्यांनी कामगार वर्गातील आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेच्या गरजेनुसार भेटवस्तू देण्याचा उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. सध्या त्या शाळेत परीक्षा विभाग प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.
शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. योगिता सतीश वाणी तसेच संस्थेचे व्यवस्थापन आणि सहकारी शिक्षकवर्ग यांनी सौ. घाडीगावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.