सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिका
schedule28 Nov 25 person by visibility 33 categoryशैक्षणिक
आदर्श शिक्षिका सौ. सुनंदा प्रकाश मुसळे : सेवेतून आदर्श घडवणाऱ्या शिक्षिका
हेरले (ता. हातकणगले) येथे राहणाऱ्या सौ. सुनंदा प्रकाश मुसळे यांनी शिक्षणसेवेत तब्बल ३२ वर्षे उल्लेखनीय कामगिरी करत समाजमनात आदर्श शिक्षिकेची छाप पाडली आहे. १९९३ साली त्यांनी सह-शिक्षक म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली आणि आजही हेरले येथील प्राथमिक शाळा ( शाळा क्रमांक. २) येथे तितक्याच उत्साहाने व निष्ठेने कार्यरत आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या मुसळे मॅडम यांनी नेहमीच गरीब व होतकरू विद्यार्थिनींना आधार दिला. पुस्तकं, वह्या, गणवेश तसेच आर्थिक अडचणीत असलेल्या मुलांना मदतीचा हात देत त्यांनी अनेक कुटुंबांचे अश्रू पुसले. शिक्षिकेची भूमिका केवळ वर्गापर्यंत मर्यादित न ठेवता समाजाभिमुख कार्यातही त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे अशा अनेक सामाजिक उपक्रमांत त्या नियमित सहभागी होत असतात. शाळेतील आरोग्य तपासणी, स्वच्छता अभियान, पोषण सप्ताह यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांचे मार्गदर्शन विशेषत्वाने जाणवते. अध्यापन कौशल्य अधिक परिणामकारक व्हावे म्हणून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारतर्फे आयोजित अनेक शैक्षणिक प्रशिक्षणांमध्ये सहभाग घेतला असून, निरंतर स्वतःला अद्ययावत ठेवण्याची त्यांची धडपड कायम दिसते.
शिक्षण क्षेत्रातील त्यांचे सातत्यपूर्ण योगदान आणि विद्यार्थ्यांवरील प्रेम पाहता चाटे शिक्षण समूहाकडून त्यांना ‘आदर्श शिक्षिका’ हा सन्मान प्रदान करण्यात आला. हा सन्मान त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासोबतच अनेक शिक्षकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
सौ. मुसळे या आपल्या शांत, संयमी आणि प्रेमळ स्वभावामुळे विद्यार्थ्यांत अत्यंत लोकप्रिय आहेत. शैक्षणिक गुणवत्ता, मूल्य शिक्षण, सामाजिक जाण आणि शाळेतील शिस्त या सर्व गोष्टी त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये रुजवल्या. ग्रामीण भागातील शाळेत काम करूनही त्यांनी मुलांच्या स्वप्नांना योग्य दिशा दिली आणि आत्मविश्वास वाढवण्याचे काम केले.
३२ वर्षांचा त्यांचा शिक्षणप्रवास हा केवळ सेवेचा कालावधी नसून विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रकाश टाकणाऱ्या दिव्यांचा प्रवास आहे. त्यामुळेच आज सौ. सुनंदा प्रकाश मुसळे या नावाने संपूर्ण परिसरात कर्तृत्ववान आणि आदर्श शिक्षिका म्हणून गौरवाने परिचय निर्माण केला आहे.