
कपिल घाटगे - आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : दि.११ सप्टेंबर रोजी समर्थ सोशल फाउंडेशन, जनरल हॉस्पिटल व न्यूट्रीफिल हेल्थ प्रोडक्ट्स प्रा.लि.यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे "राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार" वितरण सोहळा उत्साहात पार पडला.
समाजामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या अनेक संस्था,अनेक व्यक्ती आहेत परंतु समर्थ सोशल फाउंडेशन व शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र, यांच्या वतीने मानसोपचार व शास्त्र यांची सांगड घालून समाजातील व्यसनाधीनता नष्ट करून त्यांचे कौटुंबिक जीवन आनंददायी घडवण्याचे कार्य संस्थेच्या माध्यमातून हजारो सदस्य करीत आहेत. त्यामध्ये २८ जनसंपर्क अधिकाऱ्यांनी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना "राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार"देऊन त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा सन्मान वित्त विभाग मंत्रालय, मुंबई सहाय्यक संचालक अतुल आकुर्डे , आरटीओ कोल्हापूरचे मोटार वाहन निरीक्षक संदीप गडकर, शिव समर्थ असोसिएट्सचे एम डी विशाल जाधव या प्रमुख मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर निवासी केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तींचाही सत्कार करण्यात आला.यावेळी समर्थ सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष सागर देसाई उपस्थित होते.
यावेळी अतुल आकुर्डे यांनी आपल्या मनोगतामध्ये संस्थेसोबत तुमचे सर्वांचे कार्य खूप कौतुकास्पद आहे.आम्ही प्रशासकीय सेवेत असल्यामुळे असे कार्य करण्याची संधी आम्हांस मिळत नाही, हा संपूर्ण सोहळा पाहून मला खूप आनंद झाला. तुमच्या या कार्यामध्ये खारीचा वाटा म्हणून मी संस्थेस लागेल ते सहकार्य करीन अशी भावना व्यक्त केली.
यावेळी संदीप गडकर म्हणाले, वर्षानुवर्षे व्यसन करणाऱ्या व्यक्तीला २५ ते ३० दिवसांमध्ये संस्था व्यसनमुक्त करून त्याच्या कुटुंबाचे भविष्य उज्वल घडवते तुमच्या या महान कार्यास माझा सलाम आणि शुभेच्छा...
यावेळी युवा उद्योजक विशाल जाधव यांनी मत व्यक्त केले की, आपल्या देशातील व्यसनाधीनता नष्ट करून देशाला आर्थिक महासत्ता होण्यासाठी समर्थ सोशल फाउंडेशन उल्लेखनीय कार्य करत आहे.
संस्थेचे अध्यक्ष सादिक शेख यांनी संस्थेविषयी व संस्थेच्या अभियानाविषयी संपूर्ण माहिती दिली. त्याचबरोबर निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष सागर देसाई यांनी केंद्राच्या माध्यमातून होणाऱ्या कामाची सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे संचालक असलम शेख व आभार संचालक सुहास पाटील यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व पदाधिकारी, विस्तार अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, पुरस्कार विजेते व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.