यंदा फक्त ' ए आबा घुमीव 'च वाजणार
schedule28 Aug 22 person by visibility 257 categoryलाइफस्टाइल

असित बनगे : आवाज इंडिया प्रतिनिधी
कोल्हापूर : कोल्हापूरसह राज्यभरातल्या गणेशोत्सवात यंदा फक्त ' ए आबा घुमीव ' !! कोल्हापूर मायबोली मराठीतील अस्सल बोलीभाषेतल्या इरसाल शब्दांचा चपखल वापर करून बनलेले ' ए आबा घुमीव ' हे गाणे यंदाच्या गणेशोत्सवात धुमाकुळ घालण्यासाठी सज्ज झाले आहे .
'मेलडी क्रिएटर्स 'या संस्थेने या आगळ्यावेगळ्या गाण्याची निर्मिती केली आहे . मेलडी क्रिएटर्सचे सचिन बारटक्के , उद्योगपती प्रविणभाई शहा आणि संतोष पांचाळ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली .
यंदाच्या गणेशोत्सवात तर हे गाणे धुमाकुळ घालेलच , पण इथून पुढे होणारे सार्वजनिक कार्यक्रम , मिरवणूका , लग्न समांरभ , रोड शो , जाहीर सभा अशा कार्यक्रमात तरूणाईसह , बालक , तरूणी , इतकेच काय ज्येष्ठ नागरिकांनाही या गाण्याच्या ठेक्यावर बेधुंद होवून नृत्य करण्याचा मोह आवरणार नाही , असा दावा बारटक्के , शहा आणि पांचाळ यांनी यावेळी बोलताना केला .
मराठी भाषेच्या व्याकरणाच्या चौकटीत कुठेही न बसणारे पण ज्याचा उच्चार होताच लाल मातीतल्या रांगड्या कोल्हापूरचे नाव ओठावर येते , अशा पद्धतीने कोल्हापूरात खास कोल्हापूरी " ईरसाल मराठी बोलीभाषेतील शब्दांचा सर्रास केला जातो. चालतंय की ' ... ' हुडीक ' ... ' ईषय हार्ड ' .... ' चक्कीत जाळ ' .... ' बंद पड ' ... ' कोळसा वड ' .... ' तोडलंस भावा ' ' सप्पय गावलंय ' ..... ' तिखाट जाळ ' रांडच्या ' ...... ' बट्ट्या पाऊस ' ..... ' फाश्टात ' ..... ' थर्ड मारतंय ' .... ' पुड्या सोड ' ... अशा ईरसाल बोली भाषेतील शब्दांनी कोल्हापूरी मराठी भाषेला स्वत : चे असे एक खास स्थान मिळवून दिले आहे . यातील जवळपास नव्वद टक्के शब्द मराठी प्रमाणभाषेच्या चौकटीत कुठेही आढळत नाहीत . पण या शब्दांचा उच्चार करणारा रांगडा कोल्हापूरी आहे , याची लगेच ओळख पटते . याच शब्दांचा अचूक मिलाफ घडवत ' ए आबा घुमीव ' हे गाणे आकाराला आले आहे .
सचिन बारटक्के यांनी लिहिलेल्या या गाण्याला ' मीटर ' मध्ये बसवत कोल्हापूरचा गुणी युवा संगीतकार शुभम साळोखे याने हे गाणे संगीतबद्ध केले आहे . शुभम साळोखे याच्याच स्टुडिओमध्ये हे गाणे ध्वनीमुद्रित करण्यात आले आहे . पार्थ कोठावळे आणि सचिन बारटक्के यांच्या आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे . या गाण्याला यमक नाही . गद्य , पद्य आणि रॅप याचा सुरेख संगम साधत बनलेल्या या • गाण्यासाठी रांगड्या शब्दांच्या वापरावर भर देण्यात आला आहे . हे गाणे कोल्हापूरची रांगडी ओळख देशभरात नेईल , असा विश्वास प्रवीणभाई शहा आणि संतोष पांचाळ यांनी शेवटी बोलताना व्यक्त केला .