टनामागे 200 किलोची चोरी करणाऱ्यांनी राजारामच्या काट्याविषयी बोलू नये - शिवाजी रामा पाटील यांचा पलटवार
schedule12 Apr 23 person by visibility 110 categoryराजकीय

कोल्हापूर ;
राजाराम कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्तारूढ आघाडीचे नेते अमल महाडिक यांनी राधानगरी तालुक्यातील धामोड परिसरातील सभासद शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विरोधकांचा खरपूस शब्दात समाचार घेतला. ज्यांनी तुमचे सभासदत्व रद्द करण्याचा घाट घातला असे लोक आता निवडणुकीच्या तोंडावर तुमचे पाय धरायला येत आहेत, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. असे आवाहन अमल महाडिक यांनी केले.
यावेळी बोलताना कारखान्याचे माजी अध्यक्ष शिवाजी रामा पाटील यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडले. गगन बावड्याच्या डी वाय कारखान्यात टनामागे 200 किलो उसाची राजरोसपणे चोरी होते. अनेक ट्रॅक्टर चालक याबाबत खाजगीत बोलत असतात. पण या गावगुंडांना विचारणार कोण म्हणून ऊस पुरवठा करणारे शेतकरी गप्प बसतात. याउलट राजाराम कारखान्याच्या काट्यावर केलेले वजन बिनचूक येते, याचा प्रत्यय सभासदांना आला असल्यामुळे दरवर्षी कारखान्याला सभासद जास्तीत जास्त ऊस घालत असतात. जे गगनबावड्यात घडतय ते कसबा बावड्यात होऊ देणार नाही असा इशाराही शिवाजीरामा पाटील यांनी दिला.
जमिनी लाटणाऱ्यांनी आणि डोनेशनच्या पैशावर गब्बर बनलेल्यांनी महाडिकांवर बोलू नये, असा सज्जड इशाराही पाटील यांनी दिला. शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर तुमच्या कॉलेजमध्ये शेतकऱ्याच्या पोराला डोनेशन न घेता आणि कमीत कमी फी मध्ये ऍडमिशन द्या असा उपरोधिक सल्लाही शिवाजी रामा पाटील यांनी दिला.
यावेळी जयसिंग खामकर, के.पी.चरापले, सदाशिव कोरे, विश्वास बिडकर, मारुती पाटील, पंकज पाटील, मारुती नलवडे, सुभाष गुरव यांच्यासह सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.