राजारामवर खोटे आरोप करणाऱ्या विरोधकांना खड्यासारखे बाजूला करा
schedule21 Apr 23 person by visibility 179 categoryराजकीय

* - स्वाभिमानीचे वैभव कांबळे यांचा घणाघात*
राजाराम साखर कारखाना निवडणूक प्रचारार्थ हातकणंगले तालुक्यातील लाटवडे गावामध्ये सत्ताधारी सहकार आघाडीची प्रचार सभा झाली. या सभेला खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार अमल महाडिक, अशोकराव भगवानराव पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे, अमरसिंह पाटील, माजी महापौर सुनील कदम, सत्यजित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांनी राजाराम कारखान्याच्या कारभाराचे कौतुक केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला राजाराम कारखान्यावर दरासाठी कधीही आंदोलन करावे लागले नाही, अशा शब्दात त्यांनी कारखाना प्रशासनाचा गौरव केला. आता काही विरोधक कारखान्याच्या वजन काट्यावरून खोटे आरोप करत सुटले आहेत पण मी साक्षीदार आहे राजाराम कारखान्याचा वजन काटा चोख आहे. राजारामची नाहक बदनामी करणाऱ्या विरोधकांना या निवडणुकीत खड्यासारखे बाजूला काढा, असे आवाहन कांबळे यांनी केले.
यावेळी सत्ताधारी सहकार आघाडीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबाही त्यांनी जाहीर केला. राजाराम कारखाना सभासदांच्या मालकीचा राहायचा असेल, सहकार टिकवायचा असेल तर सहकार आघाडी शिवाय पर्याय नाही, असेही कांबळे म्हणाले.
यावेळी बोलताना खासदार धनंजय महाडिक यांनी विरोधकांवर ताशेरे ओढले. गृहराज्यमंत्री असताना शेतकऱ्यांना गुराप्रमाणे मारणारे आता शेतकऱ्यांचे कैवारी बनू पाहत आहेत. पण त्यांच्या या सोंगाला राजारामचे सभासद भुलणार नाहीत, अश्या शब्दात त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.
ज्यांनी प्रत्येक ठिकाणी सहकाराचा गळा घोटला ते आज सहकार वाचवण्याची भाषा करत आहेत हा मोठा विनोद असल्याची टिप्पणी महाडिक यांनी केली.
तसेच बंडोपंत कुलकर्णी यांनी सर्जेराव माने यांच्यावर सडकून टीका केली. सर्जेराव माने तुम्हाला दोन वेळा महाडिक साहेबांनी चेअरमन केले. त्यांनी तुमच्यासाठी आणखी काय करायला हवे होते? कारखान्याला तुमचे नाव द्यायचे होते का असा सवाल कुलकर्णी यांनी उपस्थित केला.
या सभेला देवाप्पा चोपडे, अशोक माळी, अरुण पाटील, उत्तम पाटील, दिनकर पाटील, किरण माळी, रणजीत पाटील, संजय देसाई, राधिका पाटील, शिवाजी शेंडगे यांच्यासह विविध मान्यवर सभासद शेतकरी आणि ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी केली होती.