डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पाणी विघटन पद्धतीला पेटंट*
schedule04 Jun 23 person by visibility 105 category

कोल्हापूर:
ऊर्जा साठवणूक उपकरणांसाठी तसेच पाणी विघटनासाठी अतिशय महत्त्वाचा घटक ठरणाऱ्या पदार्थांच्या "पातळ फिती" (थिन फिल्म्स) बनवण्याच्या पद्धतीला डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च विभागातील संशोधकांना भारतीय पेटंट प्राधिकरणाकडून नुकतीच मान्यता मिळाली आहे. ऊर्जा साठवणूक व पाणी विघटनासाठी उपयोगात येणाऱ्या “निकेल कोबाल्ट फॉस्फेट थिन फिल्म्स” बनविण्याच्या सोप्या आणि कमी खर्चिक ‘सिलार’ या रासायनिक पद्धतीसाठी हे पेटंट जाहीर झाले आहे.
भारत सरकारच्या पेटंट प्रमाणपत्र कार्यालयात सन २०२२ मध्ये रिसर्च डायरेक्टर प्रा. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधित आणि प्रमाणित केलेल्या ‘सिलार’ या पद्धतीसाठी पेटंट मिळवण्याबाबत अर्ज सादर केला होता. १९ मे २०२३ रोजी संशोधकांच्या नावे हे पेटंट मंजूर केले गेले. या शोधाअंतर्गत प्रमाणित केलेली नाविन्यपूर्ण ऊर्जा साठवणुकीची व पाणी विघटनाची पद्धत पुढील २० वर्षासाठी डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या नावे पेटंट स्वरूपात संरक्षित केली जाईल.
या संदर्भात संस्थेचे कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी माहिती देताना सांगितले कि, “डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या अंतर्गत निर्गमित झालेले हे २१ वे पेटंट आहे. विद्यापीठ आणि संशोधकांच्या दृष्टीने ही बाब आनंददायी आहे. मुख्य संशोधक डॉ. उमाकांत पाटील यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, संपत चाललेल्या कच्च्या तेलाचे साठे आणि त्याच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची हानी होत आहे, म्हणूच ऊर्जा साठवणुकीवर तसेच पाण्यापासूनच्या ऑक्सीजन (O2) आणि हायड्रोजन (H2) उत्पादनावर अधिक संशोधन करणे गरजेचे आहे. सदर शोध पद्धतीद्वारे तयार केलेल्या पातळ फिती ह्या विद्युत प्रवाहाचा उपयोग करून पाण्याचे ऑक्सिजन आणि हायड्रोजनमध्ये विघटन करण्यासाठी अत्यंत कार्यक्षम आहेत. तसेच ऊर्जा साठवणुकीसाठी बनवल्या जाणाऱ्या विद्युत घट तसेच सुपरकपॅसिटर आणि बॅटरी मध्येसुद्धा अत्यंत प्रभावी आहेत.
या संशोधनामध्ये मुख्य संशोधक प्रा. सी. डी. लोखंडे व डॉ. उमाकांत महादेव पाटील यांच्यासमवेत संशोधक विद्यार्थी विनोद वसंत पाटील, संभाजी शिवाजी कुंभार, आणि श्रद्धा बंडोपंत भोसले यांचा सहभाग होता. पेटंट मिळवण्यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व संशोधकांचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त व शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल आणि कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.