
आवाज इंडिया
गौरव शिंदे
गेल्या काही दिवसापासून शांततेच्या मार्गाने सुरु असलेले ऊस दराच्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागत चालले आहे. या ऊस दराचा तोडगा निघाला नाही तर शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष अटळ आहे.
गत हंगामातील उसाला दुसरा हफ्ता 400 रुपये आणि यावर्षी पहिली उचल 3500 रुपये द्या अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 22 दिवस 522 कि मी आक्रोश पदयात्रा काढत शांततेच्या मार्गाने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाना प्रशासनाला निवेदन देऊन मागील हफ्त्याची मागणी केली आहे परंतु या बाबत अद्याप एकही कारखान्याने सकारात्मकता दाखवलेली नाही.
उत्पादन खर्च वाढलेला असताना चालू हंगामासाठी 3500 रुपये पहिली उचल व मागील 400 रुपये मिळावेत अशी शेतकऱ्यांची भावना आहे.संघटनेचे कार्यकर्ते सद्या ठिकठिकाणी ऊस तोडी बंद पाडत आहेत. जर कारखानदार ऐकत नसतील आणि शेतकऱ्यांना हक्काचे पैसे मिळणार नसतील तर दिवाळी नंतर आंदोलन तीव्र करू असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागत आहे.काही ठिकाणी बंदोबस्तात ऊस वाहतूक सुरु आहे. या पूर्वीचा इतिहास बघितला तर शेतकरी संघटनेमुळे शेतकऱ्यांना उसाचा दर वाढून मिळाला आहे अशी भावना शेतकऱ्यांची आहे त्यामुळे अनेक गावात ऊस दराचे आंदोलन मिटत नाही तोपर्यंत ऊस तोड घ्यायची नाही असा ठराव करण्यात आला आहे.