Awaj India
Register
Breaking : bolt
जय हनुमान हायस्कूल व बाळकृष्ण विष्णू वडेर ज्युनिअर कॉलेज, इस्पुर्लीचा स्तुत्य उपक्रमसायबर गुन्ह्यांविरोधात जनजागृतीसाठी* *‘एनसीआरसी’ सेंटर प्रभावी ठरेलऊसतोड कामगार, मुकादम व वाहतूकदारांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप करावा!आबाजी होणं सोपं नाही!अबब!!!! अंबाबाईच्या भक्तांकडून तब्बल चारशे किलो खिचडी, वाटपसाताऱ्यात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराला वेग; डॉ. श्रुती जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेटींचा धडाका!*शिक्षकांना कॅशलेस आरोग्य विमा, शिक्षिकांना विशेष रजा मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार!*सोलापुरात कौस्तुभ गावडे यांच्या प्रचाराचा झंझावात; शिक्षक संघटना आणि शिक्षक नेत्यांचा भक्कम पाठिंबा!*शिक्षकांच्या प्रश्नांसाठी कौस्तुभ गावडे यांना पसंतीक्रमांक १ चे मत देऊन विजयी करा!स्मिता जाधव, कौस्तुभ गावडे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीची ताकद*

जाहिरात

 

जय हनुमान हायस्कूल व बाळकृष्ण विष्णू वडेर ज्युनिअर कॉलेज, इस्पुर्लीचा स्तुत्य उपक्रम

schedule01 Nov 26 person by visibility 31 categoryशैक्षणिक

क्षेत्रभेटीतून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ज्ञानाची शिदोरी; पोलीस स्टेशन, बँक आणि पोस्ट ऑफिसच्या कामकाजाची घेतली माहिती
जय हनुमान हायस्कूल व बाळकृष्ण विष्णू वडेर ज्युनिअर कॉलेज, इस्पुर्लीचा स्तुत्य उपक्रम; विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानासह प्रशासकीय कामकाजाचा अनुभव
इस्पुर्ली : विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनातील व्यवहार, शासकीय यंत्रणा आणि विविध संस्थांचे कामकाज समजावे, या उद्देशाने जय हनुमान हायस्कूल व बाळकृष्ण विष्णू वडे ज्युनिअर कॉलेज, इस्पुर्ली यांच्या वतीने 'संस्था भेटीतून शिक्षण' या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रभेटींचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी इस्पुर्ली पोलीस स्टेशन, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची (KDCC Bank) इस्पुर्ली शाखा आणि इस्पुर्ली पोस्ट ऑफिसला भेट देऊन तेथील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचा अनोखा अनुभव मिळाला.
पोलीस स्टेशन भेटीतून कायदा व सुव्यवस्थेची माहिती
संरक्षण शास्त्र विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत इयत्ता आठवी तसेच अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी इस्पुर्ली पोलीस स्टेशनला क्षेत्रभेट दिली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांनी विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमधील दैनंदिन कामकाजाची सविस्तर माहिती दिली.
गुन्ह्यांची नोंद कशी केली जाते, गुन्ह्यांचा तपास कोणत्या पद्धतीने होतो, आपत्कालीन परिस्थितीत डायल ११२ या यंत्रणेचे कार्य कसे चालते, संगणक कक्ष, पोलीस रेकॉर्ड, शस्त्रास्त्रे आणि लॉकअप याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शस्त्रांची माहिती घेण्याची तसेच संदेशवहन यंत्रणा हाताळण्याची संधी देण्यात आली. पोलीस दलातील भरती प्रक्रिया, आवश्यक पात्रता आणि करिअरच्या संधी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीचा जवळून अनुभव घेता आला.
बँकेत पैसे जमा करणे, पैसे काढणे, खात्यांचे व्यवहार, बँकिंग सेवांचे महत्त्व आणि आर्थिक व्यवहारांची पद्धत याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही उत्सुकतेने विविध प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. गणित विषयातील संकल्पना प्रत्यक्ष आर्थिक व्यवहारांशी कशा जोडलेल्या आहेत, याची विद्यार्थ्यांना या भेटीतून जाणीव झाली.
या उपक्रमाचे नियोजन प्रा. टी. एम. माळी, विकास कांबळे आणि विशाल पाटील यांनी केले. मुख्याध्यापक पी. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
पोस्ट ऑफिस भेटीतून पत्रव्यवहार आणि डिजिटल सेवांची ओळख
विद्यार्थ्यांनी इस्पुर्ली पोस्ट ऑफिसलाही भेट दिली. पोस्टमास्तर संजय पताडे यांनी पोस्ट खात्याच्या विविध योजना, विमा योजना आणि टपाल सेवेची माहिती दिली. पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, विविध प्रकारचे तिकिटे आणि टपाल साहित्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवण्यात आले.
पत्र पाठवल्यानंतर ते संबंधित व्यक्तीपर्यंत कशा पद्धतीने पोहोचते, टपाल खात्याचे कामकाज कसे चालते आणि आधुनिक काळात पोस्ट खात्याने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून सेवांमध्ये कसे बदल केले आहेत, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.


या भेटीचे विशेष आकर्षण म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड मोफत देण्यात आले. दीपावलीच्या सुट्टीत विद्यार्थी या पोस्टकार्डच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांना आणि गुरुजनांना दिवाळीच्या शुभेच्छा संदेश पाठवणार आहेत. त्यामुळे डिजिटल संदेशांच्या काळात पारंपरिक पत्रलेखनाची गोडी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा एक सुंदर प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.
या उपक्रमाचे नियोजन टी. एम. माळी आणि विकास कांबळे यांनी केले. मुख्याध्यापक पी. बी. पाटील,डॉ . अजित सूर्यवंशी ,एनसीसी ऑफिसर राजाराम चौगुले सर ,चंद्रकांत बोभाटे सर तसेच संस्थेच्या कमिटीचे मार्गदर्शन लाभले.

पुस्तकी ज्ञानाला प्रत्यक्ष अनुभवाची जोड
शिक्षण म्हणजे केवळ पाठ्यपुस्तकातील धडे आणि परीक्षेतील गुण नव्हेत, तर विद्यार्थ्यांना समाजातील विविध संस्था, त्यांचे कामकाज, आर्थिक व्यवहार, कायदा-सुव्यवस्था आणि सामाजिक जबाबदारी यांची प्रत्यक्ष ओळख होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. याच विचारातून आयोजित करण्यात आलेल्या या क्षेत्रभेटींमुळे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासन, सहकार क्षेत्र आणि टपाल विभाग या तीन महत्त्वपूर्ण यंत्रणांचा जवळून परिचय झाला.
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना देणारा, प्रश्न विचारण्याची वृत्ती विकसित करणारा आणि भविष्यातील करिअरच्या संधींची ओळख करून देणारा हा उपक्रम ठरला. जय हनुमान हायस्कूल व बाळकृष्ण विष्णू वडे ज्युनिअर कॉलेजचा हा उपक्रम अनुभवाधारित आणि कृतीशील शिक्षणाच्या दृष्टीने निश्चितच कौतुकास्पद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Awaj India.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes