संभाजी ब्रिगेडचा शाहू छत्रपतींना पाठिंबा
आवाज इंडिया
कोल्हापूर : "भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून देशामध्ये हुकूमशाही पद्धतीचा कारभार सुरू आहे. या स्थितीमध्ये लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपतींना पाठिंबा म्हणजे लोकशाही जिवंत ठेवणे आणि समतावादी विचार पुढे चालवणे होय."अशी भूमिका संभाजी ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर व प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी मांडली.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे इंडिया, महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांची संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी दुपारी न्यू पॅलेस येथे भेट घेतली. याप्रसंगी युवराज संभाजीराजे उपस्थित होते. याप्रसंगी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी शाहू छत्रपतींना पाठिंबा जाहीर केला. निवडणुकी संदर्भात चर्चा केली.
"शाहू छत्रपतींच्या प्रचारात संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते हिरीरिने सहभागी असतील. देशात आणि राज्यांमध्ये सध्या जे राजकारण सुरू आहे अशा स्थितीमध्ये समतावादी, सुधारणावादी विचाराधारेनुसार काम करणारे व सर्व समाजाच्या विकासाचे ध्येय उराशी बाळगलेल्या शाहू छत्रपती यांच्यासारखे व्यक्तिमत्व संसदेत पोहोचणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व समाजाने शाहू छत्रपतींच्या पाठीशी राहावे. संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते प्रचारातही आघाडीवर राहील आणि शाहू छत्रपतींच्या विजयी सभेसाठी येतील" असे सौरभ खेडेकर यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे म्हणाले, "महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, फुले- शाहू -आंबेडकर यांची परंपरा आहे. या महापुरुषांचा समतावादी विचार कायम टिकला पाहिजे. यासाठी कोल्हापुरातून शाहू छत्रपती विजयी होणे अत्यावश्यक आहे. संभाजी ब्रिगेडची शिवसेना ठाकरे गटासोबत युती आहे. संभाजी ब्रिगेड हा महाविकास आघाडीचा घटक आहे. या निवडणुकीत शाहू छत्रपतींच्या विजयासाठी संभाजी ब्रिगेड प्रयत्नशील राहील."
संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबने म्हणाले," शाहू छत्रपतींची निवडणुकीला उभे राहण्याची भूमिका ही साऱ्या समाज घटकाला प्रेरणादायी आहे. "
याप्रसंगी राज्य संघटक मनोज गायकवाड, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष रुपेश पाटील, ऋतुराज पाटील, दिनेश जगदाळे, विवेक मिठारी, राहुल पाटील, योगेश जगदाळे, रणजीत देवणे, आसिफ स्वार, सांगलीचे युवराज शिंदे, महेश भंडारे, प्रवीण पवार , पन्हाळ्याचे शिवाजी घोरपडे, अविनाश आंबी आदी उपस्थित होते.