कार्यालयात वेळेत न येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे
schedule23 May 25 person by visibility 29 category
कार्यालयात वेळेत न येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करा : प्रवीणभाई माणगावे
शिरोळ : प्रतिनिधी : शासनाने सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच त्यांना शासनाच्या विविध योजना लागू केल्या आहेत. यामुळे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनसेवक या नात्याने कार्यालयात वेळेत उपस्थित राहून जनतेची कामे केली पाहिजेत. पण अनेक अधिकारी व कर्मचारी वेळेत कार्यालयात उपस्थित राहत नाही याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. त्यामुळे कामचुकार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे जनता दल सेक्युलर पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस प्रवीणभाई माणगावे यांनी केली आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शासकीय कार्यालयात दररोज सकाळी पावणेदहा ते दहाच्या सुमारास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. मात्र काही अधिकारी व कर्मचारी जाणीवपूर्वक कार्यालयात येत नाहीत. अथवा विविध कारणे सांगून उशिरा कार्यालयात उपस्थित राहतात. यामुळे कामासाठी आलेल्या नागरिकांना अधिकारी व कर्मचाऱ्यांची वाट पाहात ताटकळत बसावे लागते. शासनाकडून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सर्व सोयी-सुविधा, शासकीय योजना उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच शासकीय कामकाजाचा पाच दिवसाचा आठवडा केला आहे. तरीही कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी आपआपल्या कार्यालयात येण्यास टाळाटाळ करतात. वेळेत उपस्थित राहत नाहीत. दोन-तीन दिवस कार्यालयाकडे फिरकायचेच नाही. असे करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी प्रवीणभाई माणगावे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
सदरचे निवेदन महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्यासह विविध शासकीय कार्यालयास देण्यात आले आहे.