चक्रीवादळे कशी तयार होतात?
schedule17 May 21 person by visibility 1771 categoryशैक्षणिक

पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणातील वातावरण हा महत्वाचा घटक आहे. वातावरणात हवा, हवामान, सौरशक्ती, तापमान, पर्जन्य, वारे, वातावरणातील हालचाली, घटना यांचा आढावा घेतला जातो. अलिकडे वादळे, पूर, हिमवृष्टी, दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीना मानवाला सामोरे जावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तींचा मानवी जीवनावर व सजीव सृष्टीवर परिणाम पडतो. वादळे ही नैसर्गिक आपत्ती आहे. त्यामुळे मानवी जीवन विस्कळीत होते. या वर्षीच्या मोसमामधील पहिले चक्रीवादळ 'तौक्ते' सध्या अरबी समुद्रात निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र, गुजरात,तामिळनाडू, केरळ या राज्यातील समुद्रीकिनारी प्रदेशात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सामान्य लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल वादळे कशी निर्माण होतात ? अचानक हवामानात बदल का होतो? वादळाची किंवा चक्रीवादळांची निर्मिती कशी होते? या प्रश्नाची उकल येथे केलेली आहे. वादळ ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. वादळाची निर्मिती होताना तापमान जास्त असते. जमिनीवर खाली किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होते. त्या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली की वादळाची निर्मिती होते. उष्णकटिबंधीय केंद्रभागी कमी दाबाचा पट्टा तयार होतो. त्यामुळे आजूबाजूच्या भागाकडून केंद्राकडे हवा वेगाने वाहते व वादळाची निर्मिती होते. समुद्रातून जाताना वादळाची ताकद वाढते. जमिनीवर किंवा थंड प्रदेशात वादळ आले की त्याची तीव्रता कमी व शांत होते. आवर्त व प्रत्यावर्त यांची भूमिका वादळ निर्मिती मध्ये महत्त्वाची आहे. आवर्त म्हणजे सभोवतालच्या जास्त वायुभाराच्या प्रदेशाकडून कमी वायुभाराच्या प्रदेशाकडे जेव्हा चक्राकार गतीने वारे येते त्यास आवर्त म्हणतात. प्रत्यावर्त म्हणजे मध्यवर्ती जास्त दाबाकडून सभोवताली असलेल्या कमी दाबाकडे वारे चक्राकार दिशेने असते. धुळीचे वादळ, घुर्णवात, पावसाचे वादळ, बर्फाचे वादळ, मेघगर्जनाचे वादळ, चक्रीवादळ असे वादळांचे प्रकार पडतात. समुद्रात कमी दाबाच्या प्रदेशात चारी बाजुनी येणाऱ्या वाऱ्यामुळे चक्री वादळ तयार होते. उष्ण व आर्द्र हवेचा सतत पुरवठा हे चक्रीवादळांच्या निर्मितीचे कारण आहे. समुद्राचे तापमान 26 डिग्री अंश सेल्सियस हे खाली 60 मीटर खोली पर्यत असले की हे वादळ तयार होते. चक्रीवादळाचा वेग जास्त असतो. वाऱ्यामध्ये बाष्पाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ज्या भागातून वादळ प्रवास करते त्या भागात अति मुसळधार पाऊस पडतो. चक्रीवादळांना जगभरात वेगवेगळ्या नावांनी ओळखिले जाते. हिंदी महासागरात तयार होणाऱ्या वादळांना ' सायक्लोन' म्हणतात. अटलांटिक महासागरातील वादळांना ' हरिकेन', पाॅसिफिक महासागरातील वादळांना 'टायफून', ऑस्ट्रेलियातील वादळांना विली-विलीस म्हणतात. जमिनीवर तयार होणाऱ्या वादळास 'टोरनॅडो' म्हणतात. वादळामुळे जनजीवन विस्कळीत होते. शेती, घरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हवामानातील बदलांची अचुक माहिती मिळाली तर वादळांमुळे होणारे नुकसान थोडे फार कमी करण्यास मदत होईल. किनारी भागातील लोकांना स्थलांतरीत करण्यास मदत होवू शकते त्यामुळे चक्रीवादळांची माहिती घेणे गरजेचे बनले आहे.
डाॅ युवराज शंकर मोटे
भूगोल व पर्यावरण अभ्यासक,
कोल्हापूर
मो: 9923497593