पहिल्या फेरीतच कौस्तुभ गावडे यांना विजयी करणार; शिक्षक नेते दादासो लाड यांची स्पष्टोक्ती*
schedule13 Oct 26 person by visibility 8 category
*
*महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचा कौस्तुभ गावडे यांना जाहीर पाठिंबा*
कोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या विविध प्रश्नांना केंद्रस्थानी ठेवून जुनी पेन्शन योजना, शिक्षकांचे सेवाविषयक प्रश्न आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित मागण्यांसाठी आवाज उठविण्याची भूमिका शिक्षक मित्र कौस्तुभ मुरलीधर गावडे यांनी स्पष्ट केली आहे. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समिती आणि कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ यांनी कौस्तुभ गावडे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने शिक्षकांच्या प्रश्नांवर संघटनात्मक पातळीवर संवाद आणि समन्वय साधण्याच्या दृष्टीने या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीशी 7000 हून अधिक शिक्षक संबंधित आहेत. त्यामुळे कौस्तुभ गावडे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे.
शिक्षक मतदारसंघाचा प्रतिनिधी हा शिक्षकांच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावीपणे मांडणारा आणि शासन व शिक्षक यांच्यात सातत्यपूर्ण संवाद साधणारा दुवा असावा. त्यामुळे तरुण, तडफदार आणि अभ्यासू असणाऱ्या कौस्तुभ गावडे यांना पसंती क्रमांक 1 चे मत देऊन पहिल्या फेरीतच विजयी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी आतापासूनच कामाला सुरुवात करावी, असे प्रतिपादन शिक्षक नेते दादासो लाड यांनी केले.
जुनी पेन्शनचा प्रश्न सोडविण्यासाठी लढत राहून शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करण्याची प्रसंगी लढा उभारण्याची कौस्तुभ गावडे यांनी ग्वाही दिली. जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील विविध शिक्षक व कर्मचारी संघटना सातत्याने प्रयत्नशील आहेत. या मागणीच्या अनुषंगाने शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या भावना आणि अपेक्षा शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे, संबंधित निर्णयप्रक्रियेत त्यांचा आवाज बुलंद करणे आणि प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी लोकशाही मार्गाने सातत्यपूर्ण लढा देणे आवश्यक आहे. या भूमिकेतून जुनी पेन्शनचा प्रश्न प्राधान्याने हाताळण्याचा निर्धार कौस्तुभ गावडे यांनी व्यक्त केला.
यावेळी बाबा पाटील, दत्ता पाटील, सुरेश संकपाळ, संदीप पाटील, एम. आर. पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी, माजिद पटेल, डॉ. डी. एस. घुगरे, एम. एन. पाटील, अनिल चव्हाण, मदन निकम, आनंदा चव्हाण, संजय डवर आणि शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीने जाहीर केलेला पाठिंबा हा शिक्षकांच्या प्रश्नांवरील संवादाला महत्त्व देणारा मानला जात आहे.
“शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि त्यांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहीन. जुनी पेन्शन मिळविण्याच्या मागणीसाठी निर्णायक लढा उभारण्याबरोबरच शिक्षकांचे सेवाविषयक प्रश्न, अशैक्षणिक कामांचा भार आणि शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शासनस्तरावर ठोस पाठपुरावा करणार,” अशी ग्वाही कौस्तुभ गावडे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या जाहीर पाठिंब्याच्या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शन आणि शिक्षकांच्या अन्य प्रलंबित प्रश्नांबाबत पुढील काळात कोणत्या ठोस कृती केल्या जातात, याकडे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लक्ष राहणार आहे.