मनसे आणि भाजप युती बाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण ; राजकीय घडामोडींना वेग येणार
schedule27 Sep 21 person by visibility 100 categoryराजकीय

पुणे: राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षाच्या युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते.या दोन्ही पक्षांच्या युतीबाबत अनेक तर्क-वितर्क केले जात असून, अनेकदा सूतोवाचही करण्यात आले आहे. यातच आता पुण्यातील काही मनसे नेत्यांनी भाजपशी युती करण्याची मागणी राज ठाकरे यांच्याकडे केल्याची चर्चाही आहे. या युतीचा मनसेला निवडणुकांमध्ये चांगला फायदा होईल असा दावा केल्याची चर्चाही दिसत आहे.
मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुण्याचा दौरा केला होता. आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने मनसेकडून अंतर्गत चाचपणी मोहीम सुरू असून, यावेळी मनसे नेत्यांच्या एका गटाने आगामी निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करावी, असा आग्रह धरल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता राज ठाकरे काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून अशा चर्चा माध्यमात आहेत. पण अशा चर्चांना काहीही अर्थ नसतो.
भाजपसोबत युती होणार की नाही याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख राज ठाकरेच घेतील, असे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड. गणेश सातपुते यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.आगामी महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर लढणार का, असे राज ठाकरे यांना विचारण्यात आले होते. यावर, पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत इतर कोणत्याही राजकीय पक्षाशी युती करायची की नाही, हा निर्णय परिस्थिती पाहून घेऊ, असे सूचक वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. भाजपकडूनही पुण्यात मनसेशी युती करायची असेल, तर काय काय शक्यता असू शकतील, याची पडताळणी सुरू झाली आहे, असे सांगितले जात आहे.