पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे महत्त्व..
schedule12 Sep 21 person by visibility 7068 categoryसामाजिक
डॉ. युवराज मोटे (कोल्हापूर) : भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव व परंपरेला महत्त्वाचे स्थान आहे. देशभरात विविध भौगोलिक प्रदेशानुसार सर्वत्र सण, उत्सव व परंपरा साजरे केले जातात. भारतीय सण, उत्सव व परंपरेला पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने ही महत्व आहे. यामाध्यमातून पर्यावरणाचे जतन आणि संवर्धन करणे हा ही संदेश दिला जातो. सणांच्या माध्यमातून पर्यावरण रक्षण हा ही प्रमुख हेतू असतो. निसर्गाला किंवा पर्यावरणाला अनुसरूनच सर्व धर्माचे सण, उत्सव व परंपरा आहेत. आजूबाजूच्या निसर्ग संपन्न वातावरणात सण साजरे केले जातात. सध्या गरज आहे सगळे सण हे निसर्गपूरक किंवा पर्यावरणपूरक कश्या पध्दतीने साजरे होतील हे पाहण्याची. त्यादृष्टीने जनजागृती होणे महत्वाचे आहे.
प्रत्येक सणानिमित्ताने घरामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होते. त्यामुळे व्यक्तीला, कुटुंबाला आणि समाजाला एक आत्मिक शांतता लाभते आणि आनंदही मिळतो. प्रसन्न वातावरणामुळे मनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे देशभरात साजरे करण्यात येणाऱ्या प्रत्येक सणाला विशेष महत्त्व आहे. सध्या संपूर्ण देशात गणेशोत्सवाचे मंगलमय वातावरण आहे. ढोल-ताशांच्या गजरामध्ये श्री गजाननाचे आगमन झालेले आहे. गौरीच्या स्वागताची तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह, ऊर्जा, मराठी अस्मिता व परंपरा आणी भारतीय संस्कृतीचे प्रतीक असा सण आहे.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला तर हा आनंद द्विगुणितच होईल. आनंददायी सोहळ्यासाठी पर्यावरणपूरक गणेशोत्सव कश्या पध्दतीने साजरा होईल हे पाहणे या निमित्ताने उचित ठरेल.आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा विचार करणे सुध्दा सध्या गरजेचे आहे. सध्या जागतिक तापमानवाढीमुळे निसर्गचक्र बदलत आहे. मान्सून चक्र सुद्धा बदललेली आहे. महापूर, भूस्खलन यासारख्या समस्या वाढत आहेत. त्यामुळे प्रत्येक सण हे पर्यावरणपूरक कशा पद्धतीने साजरा करता येईल हे पाहणे सध्याच्या काळामध्ये योग्य आहे. गणेशोत्सव साजरा करीत असताना जलप्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनिप्रदूषण होणार नाही याची काळजी सर्वांनी घेणे अपेक्षित आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव कशा पद्धतीने साजरा केला पाहिजे यावर प्रत्येकाने बारकाईने लक्ष देणे आवश्यक बनलेले आहे.
सण साजरे करताना उत्सवातून प्रदूषण होणार नाही याची खबरदारी प्रत्येकाने घ्यायला हवी. सध्या सर्वत्र पर्यावरण ऱ्हासमुळे विविध प्रकारच्या समस्यांचा डोंगर उभा आहे. हवा, पाणी, ध्वनी आणि जमिनीचे प्रदूषण वाढतच आहे. त्यामुळे वाढत्या प्रदूषणामध्ये आणखी भर नको. म्हणून येथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक सण, उत्सव व परंपरा साजरे करताना पर्यावरण रक्षणांचा विचार करायला हवा. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आपण काय करू शकतो व आपण स्वतः पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करण्यासाठी काय मदत करू शकतो हे ही प्रत्येकाने पाहिले पाहिजे. ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, पाणी प्रदूषण कमी करण्यास हातभार लावू शकतो. गणेशोत्सव काळामध्ये मोठ्या प्रमाणात स्पीकर लावले जातात त्यामुळे ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे कमी आवाजात स्पिकर लावणे गरजेचे आहे. आतषबाजीमुळे फटाक्यातून हवा प्रदूषण होते. त्यामुळे फटाकेमुक्त गणेशोत्सव साजरा करणे गरजेचे आहे.
गणपतीचे विसर्जन करताना नदीमध्ये किंवा तलावांमध्ये न करता मूर्ती दान करून पर्यावरण रक्षणासाठी मदत करू शकतो. गणेशोत्सवासाठी जंगलातील विविध प्रकारची पाने, फुले, फळे व वनस्पती यांचा वापर पुजा व सजावट करण्यासाठी केला जातो. त्यामुळे निसर्गातील दुर्मिळ वनस्पती नष्ट होण्याचा धोका निर्माण होतो. म्हणून गणेशोत्सवात शेतामध्ये किंवा परस बागेमध्ये पिकवल्या जाणाऱ्या बागयती फुलांचा व फळांचा वापर करुन पर्यावरणपूरक सण साजरा करण्यास हातभार लावणे गरजेचे आहे. त्यामुळे जैवविविधतेचे जतन करण्यास मदत होईल. गणेशोत्सव काळामध्ये प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. तो वापर कमी करणे महत्वाचे आहे. निर्माल्य हे निर्माल्य कुंडामध्येच टाकून पर्यावरण हानी रोखू शकतो. एक गाव एक गणपती या अभिनव उपक्रमात सहभाग नोंदवू शकतो. घरगुती गणपती विसर्जन करताना मूर्ती दान करण्यास प्राधान्य दिले तर पर्यावरण रक्षणास हातभार लागेल व पर्यावरणपूरक गणेशोत्सव करण्यास मदत होईल.
सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट आहे. त्यामुळे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. गर्दी टाळणे, भौगोलिक अंतर राखणे, मास्क वापरणे, परिसराची स्वच्छता राखणे, प्रशासकीय नियमाचे पालन करणे आणि लसीकरणास प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना प्रत्येकाने पर्यावरणपूरक साजरा करण्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.