कोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात ८१ प्रभागांमध्ये आंदोलन
schedule28 Aug 24 person by visibility 109 categoryराजकीय
*कोल्हापुरातील खड्डे बुजवण्यासाठी*
*राज्य शासनाने 50 कोटी द्यावेत- आ. ऋतुराज पाटील*
-‘खड्डे मुक्त’ कोल्हापूरसाठी कॉंग्रेसचे शहरातील सर्व ८१ प्रभागांमध्ये आंदोलन
- प्रशासक राज लादणाऱ्या महायुती सरकारविरोधात निदर्शने
कोल्हापूर
कोल्हापुरातील रस्ते खड्डेमय झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.मात्र हे खड्डे बुजविण्याची तसदी प्रशासन घेत नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय विरोधासाठी कोल्हापूरच्या जनतेला त्रास देऊ नका. राज्य सरकारने विशेष बाब म्हणून खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकेला 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी आमदार ऋतुराज संजय पाटील यांनी केली.
‘खड्डे मुक्त कोल्हापूर’ साठी काँग्रेसच्या वतीने शहरातील 81 प्रभागांमध्ये बुधवारी एकाच वेळी आंदोलन करण्यात आले. यावेळी आपटे नगर चिवा बाजार चौक येथील आंदोलनात आमदार ऋतुराज पाटील सहभागी झाले.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, खासदार शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तसेच आमदार जयश्री जाधव, आमदार जयंत आसगावकर, शहर प्रमुख सचिन चव्हाण, स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, राजेश लाटकर यांच्यासह काँग्रेसचे माजी नगरसेवक, विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ‘खड्डे मुक्त’ कोल्हापूरसाठी काँग्रेसच्यावतीने आम्ही आंदोलन करत आहोत.
कोल्हापुरातल्या रस्त्यांसाठी २७८ कोटी रुपये निधीची मागणी शासनाकडे केली होती. त्यातील शंभर कोटी रुपये रस्त्यांसाठी मिळाले असे म्हणतात. पण रस्ते कुठे आहेत? हाच प्रश्न आहे. रस्त्यांसाठी प्रशासकांसोबत आम्ही वारंवार बैठका घेतल्या.
नगरोत्थान तसेच अन्य योजनांतून रस्त्यांसाठी निधी मिळावा, यासाठी महापालिका प्रशासक यांच्याकडे वारंवार पत्रव्यवहार केला आहे. मात्र राजकीय विरोधामुळे हा निधी मिळू शकलेला नाही. पण या राजकीय विरोधामुळे कोल्हापुरकरांची गैरसोय होत आहे. शासनाने हे खड्डे बुजवण्यासाठी 50 कोटी रुपयांचा निधी द्यावा .
कोल्हापूर महापालिकेत प्रशासक आहेत. त्यांच्या आडून आपल्याला हव्या त्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचे काम महायुती सरकार करताना दिसत आहे. कोल्हापूरच्या विकासासाठी, जनतेच्या सोयीसाठी लवकरात लवकर खड्डे मुजवावेत हीच आमची मागणी आहे.
या आंदोलनावेळी ‘कोल्हापूरला खड्डेपुर करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो, महागळती सरकारचा धिक्कार असो, रस्ते द्या रस्ते द्या,आम्हाला चांगले रस्ते द्या, रकोल्हापूरवर प्रशासकराज लादणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो, अरे टॅक्स भरतोय, रस्ते द्या, अरे फाळा भरतोय,रस्ते द्या’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी महिलांनी खड्डयाभोवती रांगोळी काढल्या. त्याचबरोबर पुरोहितांच्या उपस्थितीत खड्डयाना फुले वाहून त्यांची पूजा करण्यात आली.
*अनोखे व्यापक जनआंदोलन*
काँग्रेसच्या वतीने कोल्हापूर शहरातील सर्व ८१ प्रभागात आ.सतेज पाटील यांच्या संकल्पनेतून हे अनोखे जन आंदोलन झाले. प्रत्येक प्रभागात प्रमुख कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिक ही यात सहभागी झाले.
*रस्ता रोको नाही तर निदर्शने*
हे जन आंदोलन रस्त्यावरील खड्ड्यासाठी असले तरी नागरिकांना त्रास होईल अशा प्रकारे कोणीही रास्ता रोको करू नये अशा सूचना आ. सतेज पाटील, आ.ऋतुराज पाटील यांनी दिलेल्या होत्या. या सूचना पाळत कार्यकर्त्यांनी रस्ता रोको टाळून रस्त्याच्या कडेला निदर्शने केली.
*आमच्या मरणाची वाट बघता का? -वयोवृद्ध महिलेचा संतप्त संवाल*
महापालिकेला कोल्हापुरातील जनतेकडून घरफाळा पाहिजे, पाणीपट्टी पाहिजे, अन्य सर्व कर पाहिजेत मग चांगले रस्ते का दिले जात नाहीत ?आम्ही या खड्ड्यातच मरायचे का? असा उद्विग्न सवाल वयोवृद्ध अनुराधा कुसाळे यांनी केला.