उपचार, योजनांचा नावाखाली सरकारचा भ्रष्टाचार : चंद्रकांत पाटील
schedule12 Jul 20 person by visibility 1008 categoryराजकीय
आवाज इंडिया न्यूज
कोल्हापूर:
राज्य सरकारने मृतदेहाच्या बॅगमध्ये भ्रष्टाचार, तात्पुरत्या कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार, रुग्णांना जेवण पुरवण्यात भ्रष्टाचार, मास्कमध्ये भ्रष्टाचार केला आहे. त्यासह राज्याच्या ग्रामविकास खात्याने चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजाचा ही गैरवापर केल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी रविवारी कोल्हापुरात केला.
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, 'करोना संसर्गाच्या काळात उपचार आणि उपाय योजनांच्या नावाखाली राज्य सरकारने मोठा भ्रष्ट्राचार केला आहे. हा पाहून नागरिकांचे डोळे पांढरे होतील. या सर्व प्रश्नांचा जाब महाविकास आघाडीला विचारण्यासाठी येत्या विधानसभा अधिवेशनात विचारला जाणार आहे. या अधिवेशनाची प्रतीक्षा आम्ही करत आहोत. 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ग्रामपंचायतींना १०० टक्के १४ व्या वित्त आयोगातून निधी दिला. त्यातून ग्रामपंचायतींची स्वायत्तता वाढवली. गावाच्या विकासाची कामे केल्यानंतर उर्वरित रक्कम ग्रामपंचायतींनी मुदत ठेवीमध्ये ठेवली. याच रकमेच्या व्याजावर ग्रामविकास खात्याकडून भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोपही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला. केंद्र सरकारकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर झाला असून या प्रकरणी लवकरच केंद्र सरकारला पत्र लिहून राज्य सरकारचा कारभार कळवणार आहे.' राज्य सरकारने करोना संसर्गाच्या काळात जनतेच्या पैशांचा गैरवापर करुन पीपीई किट, मास्क, रुग्णांना दिले जाणारे जेवण यापासून ते औषधांपर्यंत अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केला. तात्पुरत्या कोविड सेंटरमध्ये कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.