पुणे : लग्नानंतर पत्नी आणि मुलाची विचारपूस देखील न करणाऱ्या तसेच कौटुंबिक जबाबदारीपासून पळवाट शोधणाऱ्या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. पत्नी आणि मुलाला दरमहा 10 हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाने दिले आहेत.
सोमनाथ आणि प्रियंका यांचा 2017 मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर पुढे त्यांना मुलगा झाला. मात्र, घरात किरकोळ कारणांवरून वाद होत होते. त्यातून सोमनाथने प्रियांका आणि मुलाकडे लक्ष देणे बंद केले. चरितार्थ चालविण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रियांका भाड्याने खोली घेऊन दुसरीकडे राहत होती. स्वतःचा आणि मुलाचा सांभाळ करण्यासाठी प्रियांकाकडे कोणतेही साधन नसल्याने तिने ॲड. गायत्री कांबळे यांच्या मार्फत न्यायालयात पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरू होती. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेऊन पतीने त्याच्या पत्नी आणि मुलाचा सांभाळ करणे आवश्यक आहे. त्यांच्या देखभाल आणि उदरनिर्वाहाची व्यवस्था केली पाहिजे असे निरीक्षण नोंदवून सादर झालेल्या साक्षी पुराव्यांच्या आधारे दरमहा 10 हजार रुपये पत्नी आणि मुलाला अंतरिम पोटगी देण्याचे आदेश कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. पहाडे यांनी दिले आहेत.
(लेखिका महिला कायद्याविषयक तज्ञ अभ्यासक आहेत. अधिक माहितीसाठी +919767740618 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.)