कर्तृत्ववान मुख्याध्यापक श्रीकांत गावकर : मराठी शाळांचे ‘तारणहार’
schedule27 Nov 25 person by visibility categoryशैक्षणिक
कोल्हापूर : “मराठी शाळांचे तारणहार” ही उपमा ज्यांना सार्थ ठरते असे मा. श्रीकांत शंकर गावकर सर सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक दृष्टीकोन आणि कार्यतत्परतेने सर्वांच्या मनात स्थान निर्माण करत आहेत. बदलत्या जीवनशैलीच्या युगात इंग्रजी माध्यमाच्या प्रभावामुळे मराठी शाळांवर अस्तंगत होण्याची वेळ आली असताना गावकर सरांनी हाती घेतलेले ‘मराठी शाळा वाचवा’ अभियान राज्यभरात प्रशंसनीय ठरत आहे.
एकल पालकांची मुले, रिक्षाचालक व स्वच्छता कामगार यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांनी घेतलेला ध्यास उल्लेखनीय ठरतो. “शिक्षण हा सर्वांचा हक्क” ही भावना मनात ठेवून गावकर सरांनी अनेक विद्यार्थ्यांना नवी संधी दिली आहे.
सामाजिक योगदानाचा भक्कम ठसा
सांदीपनी विद्यासागर विद्यालयातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटप, सरस्वती विद्यालयाला टीव्ही व पंखे, तपोवन शाळेला पंखे तर कळंबा गर्ल्स हायस्कूलला प्रोजेक्टर देऊन गावकर सरांनी शैक्षणिक सुविधांसाठी मोठे योगदान दिले आहे. विविध ठिकाणी मुलांना स्वखर्चातून मदत करून ते समाजातील संवेदनशील मुख्याध्यापक म्हणून ओळखले जातात.
शाळांना पुन्हा जीवनदान देण्यासाठी रात्रंदिवस धावपळ, पालकांना भेटी, जनजागृती मोहीम, अनाथ व वंचित मुलांना आधार — अशा कामातून गावकर सरांनी समाजात मोलाची जागृती केली आहे.
सांदीपनी विद्यासागर विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वृंद यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत
“गावकर साहेबांच्या कार्याला आमचा मनःपूर्वक सलाम”
असे सांगत त्यांच्या कार्याची पावती दिली.
मराठी शाळा टिकवण्यासाठी झटणाऱ्या गावकर सरांसारख्या मुख्याध्यापकांमुळे शाळांचे भविष्य उज्ज्वल होत असून त्यांचे कार्य सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे.