चुकीचे धोरण राबवायला महापालिका सत्ताधाऱ्यांच्या बापाची नाही : माजी आमदार विलास लांडे
schedule02 Jul 21 person by visibility 1005 categoryराजकीय

- स्लग : पे अँड पार्क धोरणाचा तीव्र शब्दात केला निषेध
पिंपरी : प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड ही कामगार नगरी आहे. 'पे अँड पार्क' धोरण लागु करून महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर डल्ला मारला आहे. हे चुकीचे धोरण राबवायला महापालिका सत्ताधाऱ्यांच्या बापाची नाही, अशा तीव्र शब्दात माजी आमदार विलास लांडे यांनी सत्ताधारी भाजपच्या कारभाराचे वाभाडे काढले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने 'पे अँड पार्क' धोरण लागू केले आहे. त्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध करण्यात आला. या वेळी निषेध आंदोलनात माजी आमदार विलास लांडे बोलत होते.
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल वाकडकर, नगरसेवक विक्रांत लांडे, अजित गव्हाणे,पंकज भालेकर, फजल शेख, , लाला चिंचवडे, योगेश गवळी, मयुर कलाटे, विशाल काळभोर, नगरसेविका सुलक्षणा शीलवंत, प्रज्ञा खानोलकर , वर्षा जगताप, आदीसह नगरसेवक पक्षाचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
माजी आमदार लांडे म्हणाले की, शहर सुंदर असावे यासाठी तत्कालीन शिक्षण मंत्री स्व. प्रा. रामकृष्ण मोरे, अण्णासाहेब मगर यांच्यानंतर देशाचे नेते माजी केंद्रीय कृषिमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शहरासाठी मोलाचे योगदान दिले. कोरोनाच्या संकटात मार्ग काढून पुढे जाण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सरकार करत आहे. शहरात शिक्षणाची गंगा सुरू व्हावी म्हणुन पॉलिटेक्निक महाविद्यालय सुरू करण्याला मान्यता दिली. सत्ता कोणाचीही असली तरी पिंपरी चिंचवड महापालिका इमारत प्रशस्त होण्यासाठी जागेची तरतुद केली. एकूणच शहराच्या विकासात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे योगदान दिले आहे. मात्र दुसऱ्या बाजुला सत्ताधारी चुकीची धोरण राबवत आहे. भाजपचे पदाधिकारी महापालिका विकायचे टेंडर काढत असल्याचा सणसणीत टोला लांडे यांनी लगावला.
प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचाराची मालिका आहे. 'पे अँड पार्क' धोरणात देखील सत्ताधाऱ्यांच्या बगलबच्यांचा विचार केला आहे. राज्यात भाजप सत्तेत असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्य नागरिकांची गाऱ्हाणी देखील एकत न्हवते. भोसरी येथे कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात त्यांचा नियोजित कार्यक्रम होता. त्यावेळी प्राधिकरणातील रिंगरोड बाधितांनी आपल्या मागण्यासाठी त्यांना भेटायचा प्रयत्न केला. मात्र, तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी रस्त्याच्या विरोधी दिशेने मार्ग काढत, वाहतुक नियमांचे उल्लंघन करत रिंग रोड बाधितांच्या प्रश्नाला बगल दिली. त्यांच्याकडून या चुका केल्या तर माफ होतात, मात्र पुर्व परवानगी घेऊन खेळाडूंची पिढी तयार करणारे जेष्ठ नेते शरद पवार यांच्यावर बालेवाडी येथे वाहने घेऊन गेल्यानंतर टीका करून विरोधकांनी आपली अक्कल पाजळण्याचे काम केले. निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपुलाचे नियोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसने विकासकामे करायची आणि उदघाटनाला सत्ताधारी दिखावा करत आहेत. आता हे खपवून घेतले जाणार नाही. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला खाली खेचल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा माजी आमदार विलास लांडे यांनी दिला. शहरवासीयांनी देखील सत्ताधाऱ्यांच्या भूलथापांना बळी न पडता त्यांना येणाऱ्या महापलिका निवडणुकीत कायमचे घरी घालवावे, असे आवाहन लांडे यांनी केले.