अंगणवाडी सेविका सौ. रेखा चव्हाण यांचे उत्कृष्ट कार्य
schedule28 Jan 26 person by visibility 14 categoryशैक्षणिक
कोल्हापूर :
उंड्री (तालुका पन्हाळा) येथील अंगणवाडी क्रमांक 304 मध्ये अंगणवाडी सेविका सौ. रेखा राजाराम चव्हाण व अंगणवाडी मदतनीस सौ. संपदा ज्ञानेश्वर सुतार यांनी अंगणवाडी सेविका म्हणून दिलेल्या उत्कृष्ट सेवेमुळे परिसरात त्यांचे विशेष कौतुक होत आहे. अंगणवाडी सेविका म्हणून पार पाडावयाच्या सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे व कार्यक्षमतेने पार पाडल्याबद्दल सौ. रेखा चव्हाण यांना अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.
अंगणवाडी सेविका सौ. रेखा राजाराम चव्हाण या बी.ए. शिक्षित असून त्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेचा उपयोग अंगणवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी केला आहे. 0 ते 6 वयोगटातील बालकांचे पोषण, पूर्वप्राथमिक शिक्षण, वजन-उंची तपासणी, लसीकरणाबाबत पालकांमध्ये जनजागृती, गर्भवती व स्तनदा मातांसाठी पोषण आहार वितरण, आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन, तसेच शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहोचवण्याचे काम त्यांनी प्रभावीपणे केले आहे.
अंगणवाडी मदतनीस सौ. संपदा ज्ञानेश्वर सुतार यांनीही सेविकेसोबत समन्वय साधत स्वच्छता, आहार वितरण, बालकांची काळजी, अंगणवाडी परिसर सुस्थितीत ठेवणे यासह सर्व कामांत सक्रिय सहभाग घेतला आहे. दोघींनी मिळून अंगणवाडीला शिस्तबद्ध, स्वच्छ व बालस्नेही वातावरण निर्माण करून दिले आहे.
अंगणवाडीतील बालकांचा सर्वांगीण विकास, महिलांचे आरोग्य, पोषण व सामाजिक जाणीव वाढवण्यासाठी केलेल्या योगदानाची दखल घेत अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सौ. रेखा चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थ, पालकवर्ग तसेच प्रशासनाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.