गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात ९० सराईत गुन्हेगारांना कडक सूचना
schedule05 Sep 26 person by visibility 25 categoryगुन्हे
कोल्हापूर:
आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोल्हापूर पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल यांच्या आदेशानुसार, कोल्हापूर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज, ५ सप्टेंबर २०२६ रोजी शाहूपुरी पोलीस ठाणे येथे शहरातील सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा 'गुन्हेगार आदान-प्रदान' कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
गणेशोत्सवाच्या काळात शहरात कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून हद्दपारी व तडीपारीसारख्या प्रभावी प्रतिबंधक कारवायांचे संकेत देण्यात आले आहेत. या बैठकीत उपस्थित सर्व गुन्हेगारांना उत्सव काळात शांतता राखण्याबाबत कडक सूचना देण्यात आल्या.
ठाणेनिहाय हजर सराईत गुन्हेगार:
या कार्यक्रमासाठी कोल्हापूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ९० सराईत आरोपींना एकत्र आणून त्यांच्या ओळख व माहितीची देवाण-घेवाण करण्यात आली:
- शाहूपुरी पोलीस ठाणे: २८
- लक्ष्मीपुरी पोलीस ठाणे: २८
- राजवाडा पोलीस ठाणे: १९
- राजारामपुरी पोलीस ठाणे: १५ (एकूण: ९० गुन्हेगार)
वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती:
या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. श्रीकांत ठिकाणे, एलसीबी निरीक्षक श्री. सुशांत चव्हाण, शाहूपुरी निरीक्षक श्री. संतोष डोके, लक्ष्मीपुरी निरीक्षक श्री. श्रीराम कन्हेरकर, राजारामपुरी निरीक्षक श्री. विकास जाधव, राजवाडा निरीक्षक श्री. किरण लोंढे यांच्यासह विविध पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.