निष्ठावंत भीमसैनिकांचा देशसेवेकडे गौरवशाली प्रवास
schedule14 Jan 26 person by visibility 19 category
कोल्हापूर :
चुये (ता. करवीर) येथील तीन निष्ठावंत भीमसैनिकांनी भारतीय सैन्याच्या परीक्षेत यश संपादन करून आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीने संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवला आहे. देशसेवा हेच जीवनाचे ध्येय मानून त्यांनी केलेली ही कामगिरी आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
अभिषेक आनंदा कांबळे यांचा संघर्षमय प्रवास विशेष भावणारा आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आजी, चुलते व चुलती यांच्या आधारावर त्यांनी जीवनाची वाटचाल केली. प्रतिकूल परिस्थिती असूनही शिक्षणाचा ध्यास न सोडता महाविद्यालयीन शिक्षण घेतले. “कष्टाशिवाय पर्याय नाही,” ही जाणीव मनाशी बाळगून दररोज कठोर सराव केला आणि अखेर आर्मीच्या परीक्षेत यश मिळवले.
रोहन कांबळे यांचे वडील धनाजी गवंडी काम करून कुटुंबाचा गाडा चालवतात. घरची परिस्थिती जाणून रोहन यांनी ऊन-पाऊस न पाहता कष्टालाच एकमेव आधार मानला. कोणतीही तडजोड न करता निव्वळ गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी आर्मीच्या परीक्षेत यश संपादन केले.
साहिल विलास कांबळे यांचे वडीलही मिळेल ते काम करून कुटुंब चालवतात. गरिबीची जाणीव ठेवत “कष्ट हेच आपल्याला तारतील” असा निर्धार त्यांनी केला. कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि चुलते सैन्यातील माजी अधिकारी, माजी सैनिक कॅप्टन बाबुराव कांबळे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे साहिलनेही आर्मीच्या परीक्षेत यशाचा ध्वज फडकावला.
या तिघांची कहाणी संघर्षातून उभ्या राहिलेल्या विजयाची आहे. देशसेवेची ओढ, कुटुंबाचा पाठिंबा आणि अढळ मेहनत यामुळे असंभवही शक्य होतो, हेच या यशाने दाखवून दिले आहे. करवीर तालुक्याच्या या सुपुत्रांनी देशासाठी उचललेले पाऊल आज अनेक स्वप्नांना नवी दिशा देणारे ठरत आहे.