गडहिंग्लज एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहू
schedule03 May 24 person by visibility 213 categoryराजकीय
युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती
गडहिंग्लज :
शाहू छत्रपती महाराज हे विकासाचे व्हिजन घेऊन निवडणुकीला उभे आहेत. ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची त्यांची भूमिका राहणार आहे. गडहिंग्लज तालुक्यातील युवकांच्या हात काम मिळवून देण्याच्या दृष्टीने येथील प्रलंबित एमआयडीसीसाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन देऊन सर्वसामान्य जनतेप्रति आदर बाळगणाऱ्या शाहू छत्रपती महाराजांना साथ द्या, असे आवाहनही युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांनी केले.
शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारानिमित्त युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती ग्रामीण भागात जोरदार प्रचार दौरे करत आहेत. गुरुवारी त्यांनी गडहिंग्लज शिवराज महाविद्यालय, शेंद्री, माद्याळ, हसूरचंपू, हेब्बाळ, निलजी, नूर, जरळी गावांत प्रचार दौरा केला.
प्रा. किसनराव कुऱ्हाडे म्हणाले, कोल्हापूरचे छत्रपती घराणे नेहमीच सर्वसामान्य जनतेशी जोडले गेले आहे. शिवशाहुंच्या आचार विचाराचा वारसा शाहू छत्रपतींनी कार्यातून जोपासला आहे. लोकशाही धोक्यात आल्यानेच ते स्वतः रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक देण्याची जबाबदारी आपली समजून प्रत्येकाने कामाला लागावे.
यावेळी गडहिंग्लजच्या माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी म्हणाल्या, गावोगावी प्रचार दौऱ्यात महिलांची मोठी संख्या, वाढता पाठिंबा हे शाहू महाराजांच्या विजयासाठी महिलांनी टाकलेले पाऊल आहे. देशाच्या पंतप्रधानानी मंगळसूत्राबाबत खालच्या पातळीवर टीका करून समस्त महिलांचा अपमान केला आहे.
ज्या मंडलिकांना निवडणुकीत आम्ही सहकार्य केले, मात्र मी गडहिंग्लजची नगराध्यक्षा असनही पाच वर्षात एकदाही आमच्या संपर्कात ते राहिले नाहीत. या निवडणुकीत भाजपला जागा दाखवू.
माजी सभापती अमर चव्हाण, हसूरचंपूच्या सरपंच प्रभावती बागी, उपसरपंच सचिन शेंडगे, माद्याळचे मनोज बोरगल्ली, नुलच्या सरपंच प्रियांका यादव यांनी शाहू छत्रपतींना जास्तीत जास्त मते देण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार असल्याचे ठामपणे सांगितले.
यावेळी ऍड. दिग्विजय कुऱ्हाडे, डॉ. नाज खलिफा,महेश पाटील, माजी जि.प. सदस्य शिवप्रसाद तेली, मार्केट कमिटी माजी सभापती श्रीरंग चौगले, सुरज माने, अनंत पाटील, विनायक चौगले, विश्वजित सावंत यांचेसह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, महिला उपस्थित होत्या.