कोल्हापूर जिल्हा दूध संघावर (गोकुळ) प्रशासक
schedule04 May 26 person by visibility 24 categoryराजकीय
कोल्हापूर जिल्हा दूध संघावर (गोकुळ) प्रशासक मंडळाची नियुक्ती; पाच सदस्यीय समितीकडे सोपवली धुरा
कोल्हापूर:
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथील संचालक मंडळाची मुदत संपल्याने आणि पुढील व्यवस्थापनात निर्माण झालेली पोकळी दूर करण्यासाठी सहकार विभागाने आज मोठा निर्णय घेतला आहे. गोकुळच्या दैनंदिन कामकाजासाठी पाच सदस्यीय 'प्राधिकृत अधिकारी मंडळाची' (Board of Administrators) नियुक्ती करण्यात आली आहे.
विभागीय उपनिबंधक (दुग्ध), पुणे विभाग, राजकुमार पाटील यांनी आज, ४ मे २०२६ रोजी याबाबतचे अधिकृत आदेश निर्गमित केले.
धोरणात्मक निर्णयांवर निर्बंध
या आदेशानुसार, नियुक्त प्राधिकृत अधिकारी मंडळाला संघाचे दैनंदिन कामकाज पाहण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, या मंडळाला कोणतेही 'धोरणात्मक निर्णय' घेण्यापूर्वी प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असणार आहे. स्वेच्छेने किंवा परस्पर कोणतेही मोठे धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ व कलम ७७ मधील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. गोकुळसारख्या मोठ्या संस्थेवर आता प्रशासकीय राजवट सुरू झाल्याने जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात या निर्णयाची मोठी चर्चा होत आहे.
असे आहे नवनियुक्त प्रशासक मंडळ:
नवनियुक्त मंडळात अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला असून सातारा जिल्हा उपनिबंधकांची अध्यक्षपदी वर्णी लागली आहे.
१. श्री. संजयकुमार विश्वनाथ सुद्रीक (जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, सातारा) अध्यक्ष
२. श्री. प्रदीप महावीर मालगावे (सहायक निबंधक, सहकारी संस्था, चंदगड, जि. कोल्हापूर) सदस्य
३. श्री. सुनील रामचंद्र धायगुडे (सहायक निबंधक, सहकारी संस्था, मुळशी, जि. पुणे) सदस्य
४. श्री. सागर बलकवडे (लेखापरीक्षक श्रेणी-२, कोल्हापूर) सदस्य
५. श्री. चंद्रकांत परूळेकर (कक्ष अध्यक्ष, धर्मादाय रुग्णालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर) सदस्य