तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?आम्ही शपथ घेणारच नाही”*
schedule13 Oct 26 person by visibility 18 category
*करवीर तालुक्यातील ठरावधारक महायुतीच्या नेत्यांवर संतापले: बैठकीत नेत्यांचीच वादावादी*
*कोल्हापूर :-* गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये करवीर तालुक्यातील ठरावधारकांची शपथ घेण्यावरून मतभिन्नता समोर आली. शपथ कुठे घ्यायची यावर नेत्यांमध्ये एकमत होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या ठरावधारकांनी “तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?, शपथ घेणारच नाही” असा पवित्रा घेत थेट बैठकीतूनच बाहेर पडणे पसंद केले.यामुळे शपथ घेण्याच्या मुद्द्यावरून चांगलाच गोंधळ उडाला. करवीर तालुक्यातील ठरावधारकांची कोल्हापूर शहरातील संकल्पसिद्धी हॉल मध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस १५० हून अधिक ठरावधारक उपस्थित होते. ठरावधारकांना शपथ देण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली होती, मात्र शपथ कुठे आणि कशी घ्यायची, यावरून नेत्यांमध्ये वाद झाला.ठरावधारकांची शपथ सौंदती डोंगरावरील रेणुका देवी इथे जाऊन घेऊ तर शपथ या इथेच घेतल्या जाव्या या मुद्द्यावरून महायुतीच्या नेत्यांमध्ये वादावादी झाली. वाद वाढल्याने अखेर कोणतीही चर्चा निर्णय न होता बैठक गुंडाळावी लागली.नेत्यांमध्येच वादावादी सुरू झाल्याने ठरावधारकांनी “तुमचा आमच्यावर विश्वास नाही का?,आम्ही शपथ घेणार नाही” अशी थेट भूमिका मांडत ठरावधारक संतप्त झाले.
यावेळी माजी चेअरमन नावेद मुश्रीफ यांनी आपली भूमिका मांडताना ठरावधारकांची शपथ ही सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या मंदिरात जाऊनच घेतली पाहिजे अशी भूमिका मांडली. तर याउलट प्रयाग चिखली येथील रघु पाटील यांनी संकल्प सिद्धी हॉलमध्येच सर्व ठरावधारकांची शपथ उरकून घ्यावी, अशी भूमिका घेतली. माजी संचालक बाळासाहेब खाडे यांनीही याला पाठिंबा देत,आमचे ठरावधारक इथेच शपथ घेतील असे ठामपणे सांगितले.
दोन्ही बाजूंनी आपापल्या भूमिका ताणुन धरल्यामुळे नावेद मुश्रीफ, बाळासाहेब खाडे आणि रघु पाटील यांच्यात काही काळ जोरदार वादावादी झाली. नेत्यांमधील हा वाद वाढल्याने हॉलमध्ये बैठकीच्या ठिकाणी एकच गोंधळ निर्माण झाला.
वातावरण तापल्यामुळे अखेर आयोजित बैठक पूर्ण होऊ शकली नाही. अखेर कोणताही ठोस निर्णय किंवा शपथ न होताच उपस्थित सर्व १५० हून अधिक ठरावधारकांना माघारी फिरावे लागले. मात्र महायुतीमधील गोंधळ आणि ठराव धारकांच्या वर दाखवला जाणारा अविश्वास पुन्हा एकदा या निमित्ताने दिसून आला. आमच्यावर जर अविश्वास तुमचा असेल तर तुम्हीही संचालक झाल्यानंतर गोकुळ दूध संघात चहा सुद्धा घेणार नाही अशी शपथ घ्या असा राग व्यक्त करत ठराव धारक पुन्हा आपल्या गावाकडे निघाले.