*निवडणूक आयोगाने अजितदादा पवार यांना न्याय दिला, जनतेकडूनही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळणार पसंती, भाजपा खासदार धनंजय महाडिक
कोल्हापूर : आवाज इंडिया
निवडणूक आयोगाने निर्णय देवून, नामदार अजित पवार गटाला राष्ट्रवादी पक्षाचे नाव आणि चिन्ह दिले आहे. सशक्त आणि प्रगल्भ लोकशाहीचा हा विजय असून, निवडणूक आयोगाने अजित पवार यांना न्याय दिला आहे. अत्यंत कार्यक्षम असलेल्या अजित पवार गटाला जनतेकडूनही आगामी निवडणूकीत पसंती मिळेल आणि राज्यात महायुतीलाच जनाधार लाभेल, असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. दरम्यान लोकशाहीचा नारा देत, उठता बसता शाहु-फुले आंबेडकरांचे नाव घेत, राजकारण करणार्या शरद पवार यांच्या एकाधिकारशाही राजकारणाचा बुरखा निवडणूक आयोगाने पुरता फाडला असून, राष्ट्रवादी कॉंग्रेसची घराणेशाहीच्या राजकारणातून मुक्तता केली आहे, असेही खासदार धनंजय महाडिक यांनी नमुद केले. जर शरद पवार राज्यघटनेचा आदर करत असतील, तर त्यांना हा निर्णय अमान्य करता येणार नाही, असेही ते म्हणाले. ५ जुलै १९९९ रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष स्थापन झाला. तेंव्हा त्याला मान्यताप्राप्त राज्यस्तरीय पक्ष असा दर्जा आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह, निवडणूक आयोगाने मंजूर केले होते. १० जानेवारी २००० रोजी या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली. पण पुढे पक्षाची कामगिरी ढासळत गेल्याने, १० एप्रिल २००४ रोजी पुन्हा त्याचा राष्ट्रीय स्तरावरील दर्जा काढून घेत, आयोगाने राज्यस्तरीय पक्षाचा दर्जा दिला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस हा पक्ष महाराष्ट्र आणि नागालँड या दोन राज्यांपुरता मर्यादित पक्ष ठरला. पक्षाचे संस्थापक शरद पवार, पक्षाच्या घटनेची पायमल्ली करत असून, नियम धाब्यावर बसवत असल्याचा आक्षेप घेणारी याचिका अजित पवार यांनी १ जुलै २०२३ रोजी निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. विधिमंडळ पक्षातील तसेच पक्षसंघटनेतील सदस्यांचे, शरद पवार यांच्याशी मतभेद आणि विसंवाद असून, विधिमंडळ व पक्षसंघटनेतील बहुसंख्य सदस्य आपल्यासोबत आहेत, असा दावा अजित पवार यांनी या याचिकेत केला होता. शिवाय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नियुक्तीविषयीही या याचिकेत आक्षेप घेतले होते. पक्षाच्या विविध समित्यांवरील नियुकत्या लोकशाही प्रक्रियेनुसार झाल्या नसल्याचा दावाही अजित पवार यांनी केला होता. त्यामुळे अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणून मान्यता मिळावी आणि घड्याळ हे पक्षचिन्ह मिळावे, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर सन २०१८ आणि २०२२ मध्ये झालेल्या पक्षाच्या संघटनात्मक निवडणुकांमध्ये, घटनात्मक त्रुटी असल्याची बाब आयोगाने नमूद केली आहे. संघटनात्मक निवडणुकांमध्ये जेव्हा घटनात्मक तरतुदींचे पालन होत नाही, तेव्हा पक्ष खाजगी मालमत्ता होते, अशा स्थितीमुळे कार्यकर्ते आणि नेते यांच्यातील संपर्क संपुष्टात येतो, असेही आयोगाने नमूद केले आहे. या याचिकेवरील निर्णय देताना, पक्षाच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा अजित पवार यांना असल्याने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हीच खरी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी असून, घड्याळ हे निवडणूक चिन्ह या गटाला वापरता येईल असा स्पष्ट निर्वाळा आयोगाने दिला आहे. पक्षाच्या एकूण ८१ आमदार, खासदार आणि विधान परिषद सदस्यांपैकी ५७ जणांचा पाठिंबा अजित पवार यांना, तर २४ जणांचा पाठिंबा शरद पवार यांना असल्याने, अजित पवार गटाला राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणून मान्यता देण्याचा निर्णय आयोगाने घेतल्याचे दिसते. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय, लोकशाही संकेतांचे पुरेपूर पालन करणारा असल्याची भावनाही खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली. आता निवडणुकीच्या राजकारणात नव्याने सामोरे जाताना, शरद पवार यांनी नव्या पक्षात पारदर्शकता व घटनात्मक शिस्तीचे पालन करावे व लोकशाहीचा आदर करावा, अशी अपेक्षाही धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.