सहाय्यक प्राध्यापिका सुमन प्रभाकर कांबळे यांना महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार जाहीर
schedule09 Nov 25 person by visibility 42 categoryशैक्षणिक
कोल्हापूर (प्रतिनिधी) – शिक्षण, साहित्य, सामाजिक कार्य आणि विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित शिक्षणाची जपणूक या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर येथील सहाय्यक प्राध्यापिका सुमन प्रभाकर कांबळे यांना यावर्षीचा “महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार” जाहीर झाला आहे. कृती फाउंडेशन यांच्या वतीने हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे कोल्हापुरात लवकरच पुरस्कारचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे.
कांबळे या एम.ए., बी.एड., सेट पात्र असून सध्या पीएच.डी. अभ्यासक्रम सुरू आहे. त्यांनी आतापर्यंत ५ वर्षांचा अध्यापन अनुभव मिळवला असून विद्यार्थ्यांना शिक्षणात रस निर्माण व्हावा यासाठी अभिनव अध्यापन पद्धती वापरतात. तसेच गरजू विद्यार्थ्यांना नेट-सेट परीक्षांसाठी विनामूल्य मार्गदर्शन करून त्यांनी अनेकांना प्रेरित केले आहे.
. कांबळे यांची साहित्यिक ओळखही तितकीच उल्लेखनीय आहे. त्यांनी “चार ओळी मनातल्या” हा चारोळी संग्रह २० सप्टेंबर २०२० रोजी प्रकाशित केला असून, त्यांच्या लेखनात समाजजागृतीचा ठसा दिसून येतो. तसेच त्यांनी कोल्हापूर आकाशवाणी केंद्रावर विविध ऐतिहासिक व सामाजिक विषयांवरील कार्यक्रमांचे लेखन व सादरीकरण केले आहे.
शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्या सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय असून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्याची परंपरा त्यांनी सुरू ठेवली आहे. त्यांचे चार शोध निबंध प्रकाशित झाले आहे.
कांबळे यांच्या कार्याचा मुख्य उद्देश म्हणजे — “शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जोपासत शिक्षणापासून वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे”.
महात्मा फुले शिक्षण गौरव पुरस्कार त्यांच्या या बहुआयामी कार्याची दखल घेत दिला जात असून, त्यांच्या या यशाबद्दल शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.