*कोल्हापूर शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांचा तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश करण्याबाबत मंत्र्यांचे आदेश - माजी आमदार अमल महाडिक यांच्या मागणीला यश*
कोल्हापूर (आवाज इंडिया)
महानगरपालिकेची आर्थिक अवस्था बिकट असल्यामुळे कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अवस्था दयनीय बनली आहे. विशेषतः कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे रस्ते खड्डेमय बनले असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांमधूनही कोल्हापुरातील रस्त्यांच्या दर्जाबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. यावर उपाय म्हणून कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे सर्व रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याने ताब्यात घेऊन त्या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आलेले सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे माजी आमदार अमल महाडिक यांनी केली होती.
त्यावेळी नामदार चव्हाण यांनी याविषयी अनुकूलता दर्शवली होती. त्यानंतर महाडिक यांनी महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग स्तरावर पाठपुरावा करून ही मागणी लावून धरली होती. आज विविध विकासकामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने कोल्हापुरात आलेल्या नामदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे अमल महाडिक यांनी या मागणीचा पुनरुच्चार केला.
यावेळी तातडीने बैठक घेऊन चव्हाण यांनी प्रस्तावित तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात या बाबीचा समावेश करून सुधारित आराखडा 13 फेब्रुवारी पूर्वी आपल्या विभागाकडे सादर करावा अशा सूचना केल्या. मंत्रिमंडळ बैठकीत यावर निर्णय घेऊन निधी वर्ग केला जाईल असे आश्वासन चव्हाण यांनी महाडिक यांना दिले.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात समावेश केल्यामुळे कोल्हापूर शहरात प्रवेश करणारे रस्ते चांगल्या दर्जाचे बनण्यास मदत होईल तसेच महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. एकूणच माजी आमदार अमल महाडिक यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे कोल्हापुरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांना लागलेले दुरवस्थेचे ग्रहण सुटले आहे. लवकरच याबाबत निर्णय होऊन चांगल्या दर्जाचे रस्ते कोल्हापूरकरांना मिळतील असा विश्वास माजी आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला.