कोल्हापुरातील महायुतीच्या तीन विधानसभा मतदार संघात ठिणगी
schedule10 Oct 24 person by visibility 254 categoryराजकीय
कोल्हापूर ; प्रशांत चुयेकर
एकीकडे कोल्हापुरात अधिकाधिक आमदार निवडून येतील यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे कागल, कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर उत्तर या तीन विधानसभा मतदारसंघात मात्र महायुतीच्या अंतर्गत वादामुळे ठिणगी पडली आहे.
कागल विधानसभा मतदारसंघात माजी खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र मंडलिक यांनी राष्ट्रवादीचे महायुतीचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना आव्हान दिले आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघात आपला पराभव केला असल्याची जाहीर टिका त्यांनी केली. आपल्याला उमेदवारी का मिळू नये असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
प्रत्येक टीकेला लगेच उत्तर देणारे पालकमंत्री मुश्रीफ यानी यावेळी मात्र चांगलच मौन बाळगले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा समजूत करण्याचा प्रयत्न केला तर म्हणावं तसा बदल होईल का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांनी कोल्हापूर उत्तर मध्ये निवडणूक लढवणार असल्याचा इशारा दिला आहे. या इशाराने दुखावलेले राज्य नियोजन महामंडळाचे कार्याध्यक्ष,कोल्हापूर उत्तरमधील शिवसेनेचे महायुतीचे संभाव्य उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी थेट कोल्हापूर दक्षिण मतदार संघात मेळावा घेतला. हा मतदारसंघ आपलाच असल्याचे सांगत थेट कोल्हापूर दक्षिणचे महायुतीतील उमेदवार भाजपचे अमल महाडिक यांना इशारा दिला.
क्षीरसागर यांचा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी चांगलाच मनावर घेतला. कोल्हापूर उत्तर मध्ये 80 हजार मते आमची असल्याचे सांगत क्षीरसागर यांना इशारा दिला. कोल्हापूर उत्तर,कोल्हापूर दक्षिण, कागल विधानसभा मतदारसंघात या ठिणगीचे आगीत रूपांतर होणार का याची वाट महाविकास आघाडीचे उमेदवार बघत आहेत.