कोल्हापूर ;
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील निगवे खालसा गावात असलेल्या श्री नृसिंह सरस्वती स्वामी मंदिरास महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास निधीतून तब्बल दोन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे.
माजी आमदार अमल महाडिक यांच्या पाठपुराव्यातून हा निधी प्राप्त झाला असून या निधीतून देवालयाच्या सुशोभीकरणासह विविध विकास कामे केली जाणार आहेत. या निधीपैकी पहिल्या टप्प्यात चाळीस लाख रुपये संबंधित विभागाकडे लवकरच वर्ग करण्यात येणार असून उर्वरित निधी टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे.
पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सरस्वती देवालयाचा कायापालट होईल आणि धार्मिक पर्यटनाच्या नकाशावर निगवे खालसा गाव अधिक ठळक होईल असा विश्वास यावेळी अमल महाडिक यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील विविध गावांमध्ये असलेल्या ग्रामदेवतांच्या मंदिरांसाठीही निधी मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले.
गावांमधील मंदिरे आध्यात्मिक आणि सामाजिक ऊर्जेची केंद्र असतात. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासनही महाडिक यांनी दिले.
हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल महाडिक यांनी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.