उद्योजकांनी पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा
schedule23 Feb 23 person by visibility 329 categoryउद्योग
*-उद्योग मंत्री उदय सामंत*
कोल्हापूर (जिमाका): उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर पर्यावरण रक्षणाच्या उपाययोजनांसाठी करण्याबरोबरच पर्यावरणपूरक कामाचा संकल्प करावा, यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
कोल्हापूरच्या कणेरी मठ येथील श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त उद्योजकांसाठी विशेष परिषद घेण्यात आली. यावेळी राष्ट्रीय हरीत लवादाचे अध्यक्ष ए. के. गोयल, उत्तर प्रदेशचे आमदार सी.पी. चंद, बीव्हीजी ग्रुपचे अध्यक्ष हणमंतराव गायकवाड, ट्रान्सग्नायझेशनचे संस्थापक रोहित अरोरा, अभिनेते संदीप कुलकर्णी, कागल औद्योगिक वसाहतीचे हरिश्चंद्र धोत्रे, पंजाबचे ओमेंद्र दत्त, सॅटर्डे क्लबचे नितीन देशपांडे, मठाचे विश्वस्त उदय सावंत, संतोष पाटील तसेच विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कणेरी मठ संस्थानचे काडसिद्धेश्वर स्वामीजी, भैय्याजी जोशी प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमानंतर उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी प्लॅस्टिक पुनर्निर्मितीप्रकल्पाला भेट दिली. तसेच 'पंचमहाभूत बोध' प्रयोग पाहून यातून पंचतत्वांच्या संरक्षणाचा संदेश प्रभावीपणे दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले, वायू आणि जल प्रदूषणापासून पृथ्वीला वाचविण्याची गरज आहे. उद्योगधंदे वाढले पाहिजेत, पण उद्योग निर्मितीनंतर त्याचे दुष्परिणाम समाजातील अन्य घटकांवर होवू नयेत, यासाठी उद्योजकांनी स्वत: आचारसंहिता घालून घ्यावी. समाजासाठी काहीतरी देणं देण्याच्या हेतूने उद्योजकांनी सामाजिक उत्तरदायित्व निधी (सी.एस.आर.) चा उपयोग पृथ्वी वाचविण्यासाठी करावा.
कोल्हापूरच्या पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला असून पंचगंगेचे शुद्धीकरण करण्याचा संकल्प सर्वांनी करावा, असे आवाहन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले. तीस दिवसांत उद्योगांसाठी परवाना देणारा कायदा येत असल्यामुळे उद्योगवाढीला गती मिळेल. परंतू, उद्योगधंद्यांमुळे प्रदूषण होणार नाही, याची काळजी उद्योजकांनी घ्यायला हवी. भविष्यात जे काही करता येईल, ते पर्यावरणासाठी उपयुक्त असेल, अशी खूणगाठ बांधून यासाठी उद्योजकांनी पुढे यावे.
पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी महत्वपूर्ण काम करणारे कणेरी मठ नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सर्वात पुढे राहिले आहे. माणसांप्रमाणेच पशुपक्ष्यांची व पर्यावरणाची काळजी घेण्याचा स्वामीजींचा संदेश सर्वांनी आत्मसात करण्याची गरज आहे. अशा कार्यक्रमांना राज्य शासन निश्चतपणे मदत करेल, असे श्री. सामंत यांनी सांगितले.
जीवनात ध्येय निश्चत करा. तीव्र इच्छाशक्ती बाळगा, ध्येय पूर्ण करण्यासाठी खडतर परिश्रम करा, असे सांगून भारतीय आयुर्वेदात मोठमोठ्या आजारांवर मात करण्याची ताकद असून त्याचा प्रसार विदेशात करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे बीव्हीजी चे हणमंतराव गायकवाड यांनी सांगितले.
पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे. पंचमहाभूतांच्या संरक्षणासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे विचार उपस्थित सर्व मान्यवरांनी व्यक्त केले.
प्रास्ताविकातून विश्वस्त संतोष पाटील यांनी या लोकोत्सवाबाबत माहिती दिली. कार्यक्रमाला देशभरातील विविध क्षेत्रातील उद्योजक सहभागी झाले.